नव्या हंगामात निर्विवाद विजयासह दमदार वाटचाल करणाऱ्या बार्सिलोनाला सेल्टा व्हिगो संघाने धक्का दिला. ला लिगा फुटबॉल स्पर्धेच्या लढतीत सेल्टा व्हिगोने बार्सिलोनावर ४-१ असा अनपेक्षित विजय मिळवत साऱ्यांनाच चकित केले. अन्य लढतीत रिअल माद्रिदने अ‍ॅथलेटिक बिलबाओवर २-१ अशी मात केली.
या पराभवामुळे गुणतालिकेत रिअल माद्रिदने दमदार आघाडी घेतली आहे. विजयामुळे सेल्टा संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. फेब्रुवारीपासून बार्सिलोनाचा स्पर्धेतला हा पहिलाच पराभव आहे. या पराभवामुळे बार्सिलोनाची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. व्हिलारिअल संघाने मलागावर १-० विजयासह तिसरे स्थान ग्रहण केले आहे.
सेल्टातर्फे नोलिटोने २६व्या मिनिटाला गोल केला. लागो अ‍ॅस्पसने चारच मिनिटात गोल करत सेल्टाला भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर थोडय़ाच वेळात अ‍ॅस्पसने आणखी एक गोल केला. बार्सिलोनाचा स्टार आघाडीपटू नेयमारने ८०व्या मिनिटाला गोल करत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. ८३व्या मिनिटाला जॉन गाइडेट्टीने सेल्टातर्फे गोल केला. उर्वरित मिनिटांमध्ये चेंडूवर नियंत्रण राखत सेल्टाने दिमाखदार विजयाची नोंद केली.
यंदाच्या हंगामात चार गोलने पराभूत होण्याची बार्सिलोनाची ही केवळ तिसरी वेळ आहे. याआधी स्पॅनिश सुपर चषक स्पर्धेत अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघाने बार्सिलोनाचा ४-० धुव्वा उडवला होता तर युएफा सुपर चषक स्पर्धेत सेव्हिला संघाने बार्सिलोनावर ५-४ असा निसटता विजय मिळवला होता.
‘‘व्यावसायिक खेळासह सेल्टाने विजय मिळवला. चेंडूवर नियंत्रण, गोल करण्याच्या संधी, बचाव अशा सर्वच आघाडय़ांवर त्यांनी अफलातून खेळ केला. त्यांच्या खेळाचा दर्जा अव्वल होते,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक ल्युइस एन्रिक यांनी सांगितले. अन्य लढतीत करीम बेन्झेमाच्या दोन गोलांच्या बळावर रिअल माद्रिदने अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघावर मात केली.

Story img Loader