सलग दुसऱ्या लढतीत चार गोल करून लुईस सुआरेझने ला लिगा फुटबॉल स्पध्रेत बार्सिलोनाला पुन्हा एकदा मोठा विजय मिळवून दिला. सुआरेझच्या दमदार कामगिरीमुळे बार्सिलोनाने स्पोर्टिग गिजॉनचा ६-० असा धुव्वा उडवून जेतेपदावरील पकड कायम राखली आहे. दुसरीकडे अ‍ॅटलेटिको माद्रिदने १-० अशा फरकाने मलगावर विजय मिळवत बार्सिलोनावर दडपण राखले, तर ०-२ अशा पिछाडीवरून रिअल माद्रिदने गॅरेथ बेलच्या दोन गोलच्या जोरावर रायो व्हॅलेकानोचा ३-२ असा पराभव केला.

ला लिगा स्पध्रेत सलग तीन पराभवांचा सामना करणाऱ्या बार्सिलोनाला सुआरेझने नवसंजीवनी दिली. गेल्या आठवडय़ात त्याने चार गोल करून बार्सिलोनाला डेपोर्टिव्हो ला कारूनावर ८-० असा विजय मिळवून दिला होता. त्यात रविवारीही त्याने हा धडाका कायम राखला. बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या खात्यात ८२ गुण जमा झाले असून रिअल माद्रिद ८१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

 

 

 

Story img Loader