अॅटलेटिको, रिअलचीही आगेकूच
इव्हान रॅकिटिक आणि लुइस सुआरेझ यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेत रिअल बेटिसवर २-० विजय मिळवला. अन्य लढतीत अॅटलेटिको माद्रिदने रायो व्हॅलकानोवर मात केली तर रिअल माद्रिदने रिअल सोसिदादला नमवले.
बार्सिलोना विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी बार्सिलोनाला इस्पॅनयोल आणि ग्रॅनडा यांच्याविरुद्धच्या लढती जिंकणे आवश्यक आहे. बेटिसविरुद्धच्या विजयामुळे बार्सिलोनाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
‘‘रिअल माद्रिद आणि अॅटलेटिको माद्रिद हे दोन्ही संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. जेतेपदासाठीची चुरस तीव्र झाली आहे. गणितीय समीकरणांवर आम्हाला अवलंबून राहून चालणार नाही. उर्वरित लढतीत सर्वोत्तम खेळ करत जेतेपदाला गवसणी घालायची आहे,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुइस एन्रिक यांनी सांगितले.
रिअल बेटिसविरुद्ध पहिल्या सत्रात बार्सिलोनाने चेंडूवर नियंत्रण राखले, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश केले. विश्रांतीनंतर लगेचच रॅकिटिकने गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. ८१व्या मिनिटाला सुआरेझने मेस्सीकडून मिळालेल्या पासचा सुरेख उपयोग करत यंदाच्या हंगामातला ५४वा गोल केला.
अँटोनी ग्रिइझमनच्या एकमेव गोलच्या जोरावर अॅटलेटिकोने रायो व्हॅकॅनोवर विजय मिळवला. अन्य लढतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि करीम बेन्झेमा यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या रिअल माद्रिदने गॅरेथ बॅलेने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर बाजी मारली. सोसिदादविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत संपणार असे चित्र असताना बॅलेने ८०व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.