३६५ दिवसांपूर्वी अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबने नोऊ कॅम्प येथे ला लिगाचे जेतेपद पटकावले होते आणि आता बरोबर वर्षपूर्तीनंतर बार्सिलोनाने गतविजेत्या अ‍ॅटलेटिकोवर १-० असा विजय मिळवत गेल्या सात वर्षांतील पाचव्या आणि एकूण २३व्या ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरले.
लुईस एन्रिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या बार्सिलोना संघाला जेतेपदासाठी केवळ एक विजय आवश्यक होता आणि मेस्सीने ६५व्या मिनिटाला गोल करून हा विजय निश्चित केला. बार्सिलोनाचा हा विजय खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू मेस्सी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या दमदार कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग आणि कोपा डेल रेय स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि ला लिगाचे जेतेपद निश्चित केले. सामन्याच्या ८व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिको संघाला गोल करण्याची चालून आलेली संधी बार्सिलोनाचा गोलरक्षक क्लाउडीओ ब्राव्होने हाणून पाडली. त्यानंतर ३३व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर मेस्सीला गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांच्या अतुलनीय कामगिरीमुळे स्टेडियममध्येही जल्लोष पाहायला मिळत असल्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य राहिला.
मध्यंतरानंतर मात्र बार्सिलोना चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. ६५व्या मिनिटाला कौशल्यपूर्ण पदलालित्याचा नजराणा मेस्सीने पेश केला. मेस्सीने डाव्या कॉर्नरवर उभ्या असलेल्या आघाडीपटू प्रेडो रॉड्रिग्ज याच्याकडे चेंडू पास केला आणि स्वत: पुढे सरकला. आपले काम अद्याप संपलेले नाही, याची जाण प्रेडोला होती आणि त्याने चेंडू पुन्हा मेस्सीकडे सोपविला. मेस्सीने अ‍ॅटलेटिकोच्या जोस गिमेनेझला चकवले आणि एक अखेरची किक मारून चेंडू गोलजाळीच्या दिशेने भिरकावला. यावेळी अ‍ॅटलेटिकोचा गोलरक्षक डिएगो गॉडीनचा ताबा सुटल्याने त्याला चेंडू अडवता आला नाही. मेस्सीने ६५व्या मिनिटाला केलेला हा गोल बार्सिलोनाच्या जेतेपदासाठी महत्त्वाचा ठरला. पंचांनी सामना संपायची शिटी वाजवली आणि बार्सिलोनाच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जेतेपद साजरे केले.

रोनाल्डोची हॅट्ट्रिक व्यर्थ
ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदापासून बार्सिलोनाला दूर ठेवण्याचे रिअल माद्रिद संघाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. इस्पानिओल संघाविरुद्धच्या लढतीत माद्रिदच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डाने हॅट्ट्रिक नोंदवून संघाला जेतेपदाच्या शर्यतीत कायम राखण्याचा प्रयत्न केला, परंतु बार्सिलोनाने अ‍ॅटलेटिको माद्रिदवर विजय साजरा करून त्याच्या या प्रयत्नावर पाणी फेरले. दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने (५९ मि., ८३ मि. व ९० मि.) हॅट्ट्रिक नोंदवून माद्रिदला इस्पानिओलवर ४-१ असा विजय मिळवून दिला. माद्रिदकडून चौथा गोल मार्सेलो डा सिल्वा ज्युनिअर (७९ मि.) याने केला, तर इस्पानिओकडून ७३व्या मिनिटाला ख्रिस्टीयान स्टुआनीने एकमेव गोल केला.

विक्रमवीर रोनाल्डो ३१० : सोमवारी हॅट्ट्रिक नोंदवीत रोनाल्डोने रिअल माद्रिदकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. रोनाल्डोने अलफ्रेडो डी स्टेफानो यांच्या ३०७ गोल्सचा विक्रम मागे टाकत खात्यात ३१० गोल्स जमा केले. या यादीत रॉल गोंझालेज ब्लांको ३२३ गोल्ससह अव्वल स्थानावर आहे.

१० : गतविजेत्या अ‍ॅटलेटिको माद्रिदला यंदा तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागणार आहे. पण असे असले तरी जेतेपदाच्या यादीत हा संघ बार्सिलोनापाठोपाठ आहे. अ‍ॅटलेटिकोच्या खात्यात १० जेतेपदे आहेत.

२३ : मेस्सीच्या करिष्माई कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने २०१४-१५चे ला लिगा जेतेपद नावावर केले. बार्सिलोनाचे हे २३वे जेतेपद असून त्यांना २४वेळा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे.

३२ : ला लिगा स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या क्लबच्या यादीत रिअल माद्रिद आघाडीवर आहे. त्यांनी ३२ वेळा ला लिगा चषक उंचावला असून २२ वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

Story img Loader