३६५ दिवसांपूर्वी अॅटलेटिको माद्रिद क्लबने नोऊ कॅम्प येथे ला लिगाचे जेतेपद पटकावले होते आणि आता बरोबर वर्षपूर्तीनंतर बार्सिलोनाने गतविजेत्या अॅटलेटिकोवर १-० असा विजय मिळवत गेल्या सात वर्षांतील पाचव्या आणि एकूण २३व्या ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरले.
लुईस एन्रिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या बार्सिलोना संघाला जेतेपदासाठी केवळ एक विजय आवश्यक होता आणि मेस्सीने ६५व्या मिनिटाला गोल करून हा विजय निश्चित केला. बार्सिलोनाचा हा विजय खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू मेस्सी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या दमदार कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग आणि कोपा डेल रेय स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि ला लिगाचे जेतेपद निश्चित केले. सामन्याच्या ८व्या मिनिटाला अॅटलेटिको संघाला गोल करण्याची चालून आलेली संधी बार्सिलोनाचा गोलरक्षक क्लाउडीओ ब्राव्होने हाणून पाडली. त्यानंतर ३३व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर मेस्सीला गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांच्या अतुलनीय कामगिरीमुळे स्टेडियममध्येही जल्लोष पाहायला मिळत असल्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य राहिला.
मध्यंतरानंतर मात्र बार्सिलोना चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. ६५व्या मिनिटाला कौशल्यपूर्ण पदलालित्याचा नजराणा मेस्सीने पेश केला. मेस्सीने डाव्या कॉर्नरवर उभ्या असलेल्या आघाडीपटू प्रेडो रॉड्रिग्ज याच्याकडे चेंडू पास केला आणि स्वत: पुढे सरकला. आपले काम अद्याप संपलेले नाही, याची जाण प्रेडोला होती आणि त्याने चेंडू पुन्हा मेस्सीकडे सोपविला. मेस्सीने अॅटलेटिकोच्या जोस गिमेनेझला चकवले आणि एक अखेरची किक मारून चेंडू गोलजाळीच्या दिशेने भिरकावला. यावेळी अॅटलेटिकोचा गोलरक्षक डिएगो गॉडीनचा ताबा सुटल्याने त्याला चेंडू अडवता आला नाही. मेस्सीने ६५व्या मिनिटाला केलेला हा गोल बार्सिलोनाच्या जेतेपदासाठी महत्त्वाचा ठरला. पंचांनी सामना संपायची शिटी वाजवली आणि बार्सिलोनाच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जेतेपद साजरे केले.
बार्सिलोना चॅम्पियन!
३६५ दिवसांपूर्वी अॅटलेटिको माद्रिद क्लबने नोऊ कॅम्प येथे ला लिगाचे जेतेपद पटकावले होते आणि आता बरोबर वर्षपूर्तीनंतर बार्सिलोनाने गतविजेत्या
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-05-2015 at 12:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona win la liga