बार्सिलोनाने व्हॅलाडोलिड संघाचा २-१ असा पराभव करून २२व्यांदा स्पॅनिश लीग करंडकाला गवसणी घातली. मात्र या विजयामुळे एका मोसमात १०० गुण मिळवण्याच्या विक्रमाच्या दिशेने बार्सिलोनाने कूच केली आहे.
ढगाळ वातावरणामुळे बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावरील सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती मंदावली होती. लिओनेल मेस्सी आणि दानी अल्वेस दुखापतग्रस्त असल्याने बार्सिलोनाचे प्रशिक्षक टिटो व्हिलानोव्हा यांनी विक्टर वाल्डेस आणि जेवियर मॅस्कारेन्हो यांना संधी दिली होती. प्रेडो रॉड्रिगेझने २२व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाचे खाते खोलले. व्हॅलाडोलिडच्या मार्क व्हॅलिएन्टे याने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू ढकलत बार्सिलोनाला २-० असे आघाडीवर आणले. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना विक्टर पेरेझने पेनल्टीवर गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण सामन्यात बरोबरी राखण्यात व्हॅलाडोलिडला जमले नाही. मुसळधार पावसामुळे जेतेपद उंचावल्यानंतरच्या बार्सिलोनाच्या परेडमध्ये चाहत्यांना सहभागी होता आले नाही.

जोस मॉरिन्हो यांचा मोसमाअखेर रिअल माद्रिदला अलविदा
स्पॅनिश लीगमधील तीन वर्षांच्या खडतर कारकीर्दीनंतर प्रशिक्षक जोस मॉरिन्हो हे मोसमाअखेरीस रिअल माद्रिद क्लबला अलविदा करणार आहेत. क्लबचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘‘प्रदीर्घ चर्चेनंतर मॉरिन्हो यांनी परस्पर सहमतीने आपला करार संपवण्याचा निर्णय घेतला. रिअल माद्रिदकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली नाही,’’ असे पेरेझ यांनी सांगितले.

Story img Loader