रिअल माद्रिदला इस्पान्योलविरुद्धच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे बार्सिलोनाच्या स्पॅनिश लीग जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. बार्सिलोनाचे हे गेल्या पाच मोसमातील चौथे तर एकूण २२वे स्पॅनिश लीग जेतेपद ठरले. शुक्रवारी अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध होणाऱ्या कोपा डेल रे चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी रिअल माद्रिदचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी या सामन्यासाठी विश्रांती घेतली होती. त्याचा फायदा उठवत ख्रिस्तियान स्टुआनी याने २२व्या मिनिटाला गोल करत इस्पान्योलला आघाडीवर आणले. दुसऱ्या सत्रात ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानावर अवतरला, पण तो फारसा प्रभाव टाकू शकला नाही. ५७व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर गोन्झालो हिग्युएन याने इस्पान्योलचा गोलरक्षक किको कॅसिला याला चकवून गोल झळकावला. या गोलमुळे रिअल माद्रिदने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. पण जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्यासाठीचा विजयी गोल लगावण्यात रिअल माद्रिदला अपयश आले.
बार्सिलोनाने चार सामने राखूनच जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. मात्र रिअल माद्रिदच्या १०० गुणांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची त्यांना संधी आहे. उर्वरित चारही सामने जिंकल्यास बार्सिलोनाचे १०० गुण होतील. बार्सिलोनाचा पुढील सामना अ‍ॅटलेटिको माद्रिदशी होणार आहे. या मोसमाच्या पहिल्या सत्रात बार्सिलोनाने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर त्यांचे जेतेपद निश्चित झाले होते. पहिल्या सत्रात बार्सिलोनाने फक्त दोन सामने गमावले होते. त्यातुलनेत माद्रिदला तीन सामन्यांत पराभूत व्हावे लागल्याने ते १८ गुणांनी पिछाडीवर पडले होते. ‘‘हे जेतेपद आमच्यासाठी संस्मरणीय ठरले आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी या सर्वाचे फळ आम्हाला मिळाले,’’ असे बार्सिलोनाचे अध्यक्ष सान्ड्रो रोसेल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा