लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेज आणि नेयमार या तीन आक्रमणपटूंच्या झंझावाताच्या बळावर बार्सिलोना क्लबने २०१४-१५ चा हंगाम दणक्यात साजरा केला. बार्सिलोनाने रविवारी युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात युव्हेंटस्वर ३-१ असा विजय मिळवून ऐतिहासिक झेप घेतली. बार्सिलोना क्लबने एकाच हंगामात ला लिगा, कोपा डेल रे आणि चॅम्पियन्स लीग स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याचा मान दुसऱ्यांदा मिळवून इतिहास घडविला. यापूर्वी बार्सिलोनाने २००८-०९ च्या हंगामात या तिन्ही युरोपियन लीगमधील महत्त्वाच्या स्पर्धावर वर्चस्व गाजविले होते. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्लब आहे.
रिअल माद्रिद क्लबसारख्या तगडय़ा संघाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश करणारा युव्हेंटस् संघ बार्सिलोनाला कडवी टक्कर देईल असे चित्र अंतिम लढतीपूर्वी रेखाटले होते. मात्र, चांगल्या फॉर्मात असलेल्या बार्सिलोनासमोर त्यांचे काहीच चालले नाही. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला इव्हान रॅकिटीकने बार्सिलोनाचे खाते उघडले. मध्य रेषेवरून मेस्सीने चेंडू पेनल्टी क्षेत्रात उभ्या असलेल्या जॉर्डी अल्बाकडे सोपविला. अल्बाने चेंडू नेयमार आणि अॅण्ड्रेस एनिएस्टा असा पुढे गोलजाळीनजीक उभ्या असलेल्या रॅकिटीककडे टोलावला. रॅकिटीकने गोलरक्षकाला चकवून अगदी सहज चेंडू गोलजाळीत पाठवून बार्सेलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र युव्हेंटस्ची बचावफळी भेदण्यात बार्सिलोनाला मध्यंतरापर्यंत अपयश आले आणि त्यांना १-० अशा आघाडीवरच समाधान मानावे लागले.
मध्यंतरानंतर युव्हेंटस्कडून आक्रमक खेळ झाला. अल्वारो मोराटाने ५४ व्या मिनिटाला गोल करून १-१ अशी बरोबरी साधल्यामुळे सामन्यातील चुरस वाढली. मात्र, ६८व्या मिनिटाला बार्सिलोनाकडून त्याला सडेतोड उत्तर मिळाले. लुईस सुआरेजने युव्हेंटस्च्या गोलरक्षकाला चकवून अगदी सहजपणे गोल करताना बार्सिलोनाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. सुआरेजच्या या गोलमुळे युव्हेंटस्ची सर्व गणिते चुकली आणि त्याचा परिणाम पुढील खेळावर प्रकर्षांने जाणवला. मात्र, मेस्सीला रोखण्याची व्यूहरचना त्यांनी अचूक पार पाडली. ९०व्या मिनिटाला नेयमारने गोल करताना बार्सिलोनाच्या विजयावर ३-१ असे शिक्कामोर्तब केले.
०५ बार्सिलोनाने पाचव्यांदा युरोपियन चॅम्पियन्स बनण्याचा मान पटकावला.
०४ बार्सिलोनाने चौथ्यांदा चॅम्पियन्स लीग स्पध्रेवर कब्जा केला आहे. याआधी २००६, २००९ आणि २०११मध्ये त्यांनी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले होते.
०६ युव्हेंटस् क्लबने पराभवानंतरही विक्रम घडविला. गेल्या ३० वर्षांत सहा वेळा युरोपियन चषक स्पध्रेच्या अंतिम लढतीत पराभव पत्करणारा हा पहिला क्लब आहे.
सुआरेजसाठी अविश्वसनीय वर्ष!
बार्सिलोना क्लबसोबत पहिल्याच हंगामात खेळणाऱ्या लुईस सुआरेजसाठी हे वर्ष अविश्वसनीय ठरले. लिव्हरपुल क्लबच्या या खेळाडूला बार्सिलोनाने आपल्या चमूत दाखल करून घेतले. मात्र, फिफाने घातलेल्या बंदीमुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले. त्यानंतर सुआरेजने नेयमार व मेस्सीसह मिळून बार्सिलोनाची आक्रमणफळी आणखी मजबूत केली. ‘‘ हा विजय अविश्वसनीय, अद्वितीय आहे. ही ऐतिहासिक झेप घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. सांघिक भावना ही या क्लबमधील जमेची बाब आहे. सत्राच्या सुरुवातीपासून आम्ही सांघिक खेळ केला.’’, अशी प्रतिक्रिया सुआरेजने चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदानंतर दिली.
मेस्सीला रोखण्यात युव्हेंटस्ला यश!
२०१४-१५ च्या हंगामात सर्वाधिक ४३ गोल्सची नोंद करणाऱ्या लिओनेल मेस्सीला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात गोल करण्यापासून रोखण्यात युव्हेंटस्ला यश आले. मेस्सीला रोखण्यासाठी आखलेल्या व्यूहरचनेची योग्य अंमलबजावणी करून युव्हेंटस्ने मेस्सीला विक्रमापासून वंचित ठेवले.
झाव्हीला विजयी निरोप
बार्सिलोना क्लबकडून अखेरचा सामना खेळणाऱ्या कर्णधार झाव्ही हर्नाडेजला विजयी निरोप मिळाला. ७६७ सामने खेळणाऱ्या झाव्हीला चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदासह निरोप घ्यावा लागला, याहून अविस्मरणीय बाब त्याच्या आयुष्यात घडली नसावी. आपल्या कारकीर्दीत झाव्हीने २५ प्रमुख स्पर्धाचे जेतेपद पटकावली आहेत. तो म्हणाला, ‘‘नेत्रदीपक, या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही. यापेक्षा क्लबकडून मी जास्त काही मागू इच्छित नाही. या क्लबकडून पुन्हा खेळता येणार नसल्याचे दु:ख वाटत आहे.’’
दिग्गज खेळाडूंविरुद्ध खेळताना जेव्हा आपल्याला वाटते की परिस्थिती आपल्या हातात आहे, तेव्हा हे खेळाडू आपल्या तोंडचा घास पळवितात. असेच काहीसे अंतिम सामन्यात झाले. जेतेपदाची संधी हुकल्याबद्दल क्षमा, परंतु संघावर टीका करायची नाही.
– मास्सीमिलिआनो अलेग्री, युव्हेंटस् क्लबचे प्रशिक्षक