स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळतानाही बार्सिलोनाने स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत मलगावर सहज विजय मिळवला. एड्रियानोने केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाने मलगावर १-० अशी मात केली.
पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना ब्राझीलच्या एड्रियानोने डाव्या पायाने मारलेला जोरदार फटका अडवताना मलगाचा गोलरक्षक विली कॅबालेरोचा पाय गवतावरून घसरला. त्यामुळे त्याला एड्रियानोचा प्रयत्न धुडकावून लावता आला नाही. ४४व्या मिनिटाला एड्रियानोने झळकावलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला.
दुसऱ्या सत्रात मलगाला गोल करण्याच्या दोन संधी चालून आल्या होत्या. पहिल्या वेळी फॅब्रिसने मारलेला फटका गोलजाळ्याला लागून बाहेर गेला. दुसऱ्या वेळी सेबॅस्टियन फर्नाडेझने गोलक्षेत्रातून मारलेला फटका बार्सिलोनाचा गोलरक्षक विक्टर वाल्डेसच्या हातात विसावला.
मेस्सीच्या अनुपस्थितीतही बार्सिलोनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांनी नेयमारला सुरुवातीला संधी दिली नाही. सेस्क फॅब्रेगस, अॅलेक्स साँग आणि एड्रियानो यांच्यावर गेराडरे यांनी विश्वास दाखवला. गेरार्ड पिकला दुसऱ्या सत्रात बार्सिलोनासाठी दुसरा गोल करण्याची संधी होती. मात्र झावीच्या फ्री-किकवर मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर आला. त्यानंतर मार्टिनो यांनी तासाभराच्या खेळानंतर नेयमारला मैदानावर उतरविले. मलगाला बरोबरी साधण्याची सुरेख संधी असताना रोक सान्ताक्रूझ याने वाल्डेसला चकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गोल करण्यात अपयश आले.
स्पॅनिश सुपर लीग : मेस्सीच्या अनुपस्थितीतही बार्सिलोनाचा विजय
स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळतानाही बार्सिलोनाने स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत मलगावर सहज विजय मिळवला.
First published on: 27-08-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barcelona wins 1 0 at malaga without lionel messi