Basit Ali said that I was considered a traitor when I asked Babar Azam to step down as captain: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी चांगली राहिली नाही. कारण पाकिस्तान संघाला पाचपैकी सलग तीन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर आणि बाबर आझमवर सातत्याने टीका होत आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने बाबर आझमला कर्णधारपद सोडून विराट कोहलीसारखा फलंदाज म्हणून आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचा सल्ला दिला. सध्या सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये बाबर आझम एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून अत्यंत संघर्ष करत आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. बाबर आझमच्या कर्णधारपदावर झालेली टीका पाहता, त्याला बासित अलीने विराट कोहलीला फॉलो करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर चाहत्यांना त्यांच्या वर्षभरापूर्वीच्या विधानाची आठवण करून दिली.
विराट कोहलीने दोन वर्षांपूर्वी टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर तो भारतीय क्रिकेट संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला होता. आता, बासित अलीची इच्छा आहे की, बाबर आझमने भारतीय सुपरस्टारच्या पावलावर पाऊल टाकावे. कारण पाकिस्तानी कर्णधार चालू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये धावांसाठी खूप संघर्ष करत आहे.
हेही वाचा – World Cup 2023: राहुल द्रविडसह भारतीय कोचिंग स्टाफने धरमशालामध्ये ट्रायंड ट्रेकचा घेतला आनंद, पाहा VIDEO
माजी पाकिस्तानी फलंदाजाने बाबरला कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला, तेव्हा लोकांनी त्याला कसे देशद्रोही ठरवले होते. याची आठवण करून देताना बासित अली एआरवाय न्यूजशी बोलताना म्हणाला, “मी एका वर्षापूर्वी माझ्या चॅनेलवर सांगितले होते की, बाबर आझम खूप चांगला फलंदाज आहे. विराट कोहलीप्रमाणे त्याने कर्णधारपद सोडले पाहिजे.”
बासित अली पुढे म्हणाला की, “कर्णधारपद सोडल्यानंतर विराटची कामगिरी पाहा. त्याच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा झाली आहे. परंतु, जसे आपण सर्व जाणतो, सोशल मीडियावर काही लोकांनी माझ्या शब्दांचा विपर्यास केला आणि मला बाबर आझम आवडत नाही आणि मी देशद्रोही आहे असे म्हटले होते.” पाकिस्तान संघ सध्या विश्वचषक २०२३च्या गुणतालिकेत चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना २७ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.