भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून समालोचन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कार्तिकने अंतिम सामन्यात केलेलं समालोचन क्रीडाप्रेमींना चांगलंच भावलं होतं. यासाठी सोशल मीडियावर त्याचं कौतुक देखील करण्यात आलं होतं. मात्र आता दिनेश कार्तिकने समालोचनावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे तो टीकेचा धनी ठरला आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
इंग्लंड आणि श्रीलंके दरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना जीभ घसरली. “बहुतेक फलंदाजांना आपली बॅट आवडत नाही. ते नेहमीच दुसऱ्याच्या बॅटला पसंती देतात. शेजाऱ्याच्या बायकोसारखं”, असं वादग्रस्त विधान त्याने समालोचन करताना केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. तर काही जणांनी त्याला माफी मागण्यास सांगितलं आहे.
“Bats are like a neighbour’s wife. They always feel better.”
WTAF?! pic.twitter.com/E8emRa5RUZ
— Rachel Romain (@RERomain) July 1, 2021
Yo @DineshKarthik, we’re always excited to hear your voice in the background of good games and your analysis has been on point but you gotta do better than that misogynistic joke. Perpetuates the same toxic masculinity that doesn’t need to exist in sport. A joke in poor taste!
— Tina Tengra (@tinatengra07) July 2, 2021
यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात समालोचन करताना नासिर हुसेनला डिवचलं होतं. नासिर हुसेन समालोचन करताना रोहित शर्माच्या फलंदाजीचं कौतुक करत होता. “रोहित आखुड चेंडूवर चांगला फटका मारतो. फिरकी गोलंदाज समोर असेल तेव्हा तो चांगलं फुटवर्क करतो. यातून चांगल्या खेळाचं दर्शन घडतं” असं नासीर हुसेननं सांगितलं होतं. त्यावर लगेचच दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिलं होतं. “हे बरोबर तुझ्या विरुद्ध आहे”, असं बोलत नासीर हुसेनला डिवचलं होतं. कारण इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन पुल शॉट खेळताना अडचणीत यायचा. बहुतेक वेळा बादही व्हायचा. कार्तिकच्या वक्तव्यामुळे नासीरचं मन दुखावलं आणि त्याने स्लेजिंक करतोस का?, असं विचारलं. मात्र त्यानंतर दोघेही हसायला लागले आणि गंभीर वातावरण क्षणात निवळलं.
दिनेश कार्तिक भारतासाठी आतापर्यंत २६ कसोटी, ९४ एकदिवसीय सामने आणि ३२ टी २० सामने खेळला आहे. कसोटीत २५ च्या सरासरीने त्याने १०२५ धावा, ३०.२० च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात १,७२५ धावा आणि टी २० स्पर्धेत ३३.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक २०१९ विश्वचषक स्पर्धेपासून संघाच्या बाहेर आहे. न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा उपांत्य फेरीचा सामना खेळला होता.