भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेत भारताला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राजकोटच्या मैदानात न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेंट बोल्टचा तेजतर्रार मारा आणि ईश सोधीच्या फिरकीपुढे भारतीय संघाने आपली हार मानली. मात्र मैदानाबाहेर झालेल्या एका सामन्यात ईश सोधीला भारतीय खेळाडूने पराभवाची धुळ चारली.
राजकोटवरुन तिरुअनंतपुरमला जाताना भारताचा युझवेंद्र चहल आणि न्यूझीलंडचा ईश सोधी यांच्यात बुद्धीबळाचा डाव रंगला. क्रिकेटमध्ये येण्याआधी चहलने बुद्धीबळ या खेळात आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या खेळात त्याला अनेक बक्षीसंही मिळाली आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार ही उत्सुकता निर्माण झाली होती. बीसीसीआयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लढतीचा एक फोटो शेअर केला आहे.
बुद्धीबळ म्हणलं की युझवेंद्र चहलला कोणतीही जागा पुरेशी असते. अगदी विमानात प्रवास करतानाही त्याने सोधीसोबत आपला डाव मांडला.
३ सामन्यांच्या मालिकेत सध्या न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे या मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात नेमकं कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. त्यामुळे बुद्धीबळात मात केलेल्या चहलने तिरुअनंतपुरमच्या मैदानात सोधीच्या न्यूझीलंडवरही अशीच मात करावी अशी आशा सर्व क्रिकेट चाहते करत आहेत.