एपी, बर्लिन
ग्रानिट झाका आणि रॉबर्ट अँड्रिच यांनी केलेल्या गोलच्या जोरावर बायर लेव्हरकूसेन संघाने जर्मनीतील बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धेत माइन्झ संघाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह लेव्हरकूसेनने जर्मन क्लब संघासाठी सर्वाधिक सामने अपराजित राहण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. सर्व स्पर्धात मिळून लेव्हरकूसेन संघ ३३ सामन्यांत अपराजित आहे.
स्पेनचा माजी मध्यरक्षक झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखाली लेव्हरकूसेन संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात त्यांनी एकही सामने गमावलेला नाही. तसेच आपल्या आक्रमक खेळानेही त्यांनी फुटबॉलरसिक आणि जाणकारांना प्रभावित केले आहे. लेव्हरकूसेनचा संघ बुंडेसलिगामध्ये ६१ गुणांसह अग्रस्थानावर आहे. त्यांनी २३ पैकी १९ सामन्यांत विजय मिळवले असून चार सामने बरोबरीत राखले आहेत. लेव्हरकूसेनने या महिन्याच्या सुरुवातीला बलाढय़ बायर्न म्युनिकवर ३-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे लेव्हरकूसेनला प्रथमच बुंडेसलिगा जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे.