बर्लिन : बायर लेव्हरकुसेन संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्टुटगार्ट संघाला ४-३ अशा फरकाने पराभूत करत जर्मन सुपर चषकाचे जेतेपद मिळवले. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत होता.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. लेव्हरकुसेन संघाने सामन्याच्या ११ मिनिटाला आघाडी घेतली. त्यांच्या व्हिक्टर बोनिफेसने स्टुटगार्टच्या बचावाला भेदत संघाच्या खात्यात पहिल्या गोलचा भरणा केला. मात्र, त्यांची ही आघाडी फार काळ कायम राहिली नाही. स्टुटगार्टच्या एन्झो मिल्लोटने (१५व्या मि.) गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला लेव्हरकुसेनच्या मार्टिन टेरिएरला लाल कार्ड दाखविण्यात आल्याने संघाला त्याचा फटका बसला. यानंतर दोन्ही संघांकडून आघाडी वाढविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, कोणत्याही संघाला यश मिळाले नाही. मध्यंतरापर्यंत बरोबरी कायम होती.
दुसऱ्या सत्रात स्टुटगार्ट संघाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या ६३व्या मिनिटाला डेनिझ उंडावने गोल करत संघाला २-१ असे आघाडीवर नेले. यानंतर स्टुटगार्टच्या खेळाडूंनी लेव्हरकुसेनला गोल करण्याची संधी दिली नाही. मात्र, सामन्याच्या ८८व्या मिनिटाला लेव्हरकुसेनच्या पट्रिक शिकने त्यांच्या बचावाला भेदत गोल केला व संघाला २-२ अशा बरोबरीवर पोहोचवले. ही बरोबरी कायम राखण्यास लेव्हरकुसेनला यश आल्याने अखेर सामना शूटआऊटमध्ये गेला. शूटआऊटमध्ये लेव्हरकुसेनच्या पट्रिक शिक, अलेजांद्रो ग्रिमाल्डो, अलेइक्स गार्सिया, एडमोंड टापसोबा यांनी गोल केले. स्टुटगार्टने तीन पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. मात्र, फ्रान्स क्रातझिग व सिलास यांना गोल करण्यात अपयश आले.
© The Indian Express (P) Ltd