चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्याला मंगळवारी सुरुवात होणार असून स्पॅनिश लीगमध्ये आघाडीवर असणाऱ्या बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेला बायर्न म्युनिचला सामोरे जावे लागणार आहे. एकाच मोसमात युरोपियन, लीग आणि कप स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा पहिला जर्मन संघ बनण्यासाठी बायर्न म्युनिच संघ उत्सुक आहे.
बार्सिलोनाचे आव्हान परतवून लावत गेल्या चार वर्षांत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठण्यासाठी बायर्न म्युनिच प्रयत्नशील असेल. गेल्या आठवडय़ात जर्मन चषकाच्या उपांत्य फेरीत बायर्न म्युनिचने वोल्फ्सबर्गला ६-१ असे हरवले होते. बार्सिलोनाविरुद्धही अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा बायर्न म्युनिचचा विचार आहे. प्रशिक्षक जुप हेयनकेस यांनी मारियो मान्झुकिक या अव्वल आघाडीवीरापेक्षा मारियो गोमेझ आणि क्लॉडियो पिझ्झारियो यांना बार्सिलोनाविरुद्ध संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
सेस्क फॅब्रेगसच्या गोलमुळे बार्सिलोनाने लेव्हान्टेवर १-० असा विजय मिळवत आपल्या संघाला स्पॅनिश लीगमध्ये १३ गुणांच्या फरकाने आघाडीवर आणले होते. पॅरिस सेंट जर्मेनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यापासून बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकलेला नाही. पण बायर्न म्युनिचविरुद्ध तो खेळण्याची अपेक्षा आहे. बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू झावी म्हणाला, ‘‘फुटबॉल हाच म्युनिचवासीयांचा श्वास आहे. त्यामुळे मंगळवारी बवारियामध्ये युद्ध रंगणार आहे.
बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेसाठी बायर्न म्युनिच सज्ज
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्याला मंगळवारी सुरुवात होणार असून स्पॅनिश लीगमध्ये आघाडीवर असणाऱ्या बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेला बायर्न म्युनिचला सामोरे जावे लागणार आहे.
First published on: 23-04-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bayern munich ready to fight against barcelona