पॅरिस सेंट जर्मेनने बार्सिलोनाला बरोबरीत रोखले
चॅम्पियन्स लीग फुटबॉल उपांत्यपूर्व फेरी
बायर्न म्युनिचने ज्युवेंट्सला २-० असे पराभूत करत चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत मजल मारण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. पॅरिस सेंट जर्मेन संघाने दोन वेळा पिछाडी भरून काढत बलाढय़ बार्सिलोनाला उपान्त्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यात २-२ असे बरोबरीत रोखले आहे. या कामगिरीमुळे पॅरिस सेंट जर्मेनने अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ज्युवेंट्सचा पाडाव करण्यासाठी बायर्न म्युनिचला फारसे कष्ट पडले नाहीत. म्युनिचने पहिल्याच मिनिटाला खाते खोलत झकास सुरुवात केली. डेव्हिड अलाबाने २५व्या सेकंदाला केलेला गोल चॅम्पियन्स लीगमधील सातवा सर्वाधिक वेगवान गोल ठरला. थॉमस म्युलरने ६३व्या मिनिटाला गोल करत बायर्न म्युनिचच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बायर्नवर मात करून उपान्त्य फेरी गाठण्यासाठी पुढील आठवडय़ात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात ज्युवेंट्सला विशेष कामगिरी करावी लागेल.
दोन वेळा पिछाडी भरून काढत पॅरिस सेंट जर्मेन संघाने बार्सिलोनाला बरोबरीत रोखण्याची करामत साधली. चॅम्पियन्स लीगमध्ये सहाव्यांदा तर बार्सिलोनाविरुद्ध तीन वेळा पॅरिस सेंट जर्मेनने ही किमया केली आहे. लिओनेल मेस्सीने ३८व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलले. दुसऱ्या सत्रात मांडीचे स्नायू दुखावले गेल्यामुळे मेस्सी मैदानाबाहेर गेला. याचा फायदा उठवत झ्लटान इब्राहिमोव्हिच याने ७९व्या मिनिटाला पॅरिस सेंट जर्मेनला बरोबरी साधून दिली. सामना संपायला दोन मिनिटे असताना झावी हेर्नाडेझच्या गोलमुळे बार्सिलोनाने २-१ अशी आघाडी घेतली. पण दुखापतीच्या वेळेत (इंज्युरी-टाइम) मातुइडी याने सुरेख गोल करत पॅरिस सेंट जर्मेनला घरच्या मैदानावर बरोबरी साधून दिली. ‘‘मेस्सी आणि झेवियर मॅस्कारेन्होला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागल्याचा फटका आम्हाला बसला. मॅस्कारेन्हो चार ते सहा आठवडे खेळू शकणार नाही. मेस्सीच्या दुखापतीचा बुधवारी एमआरआय काढण्यात येईल. त्यानंतरच त्याच्या दुखापतीचे स्वरूप लक्षात येईल,’’ असे बार्सिलोनाचे सहप्रशिक्षक जॉर्डी रौरा यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा