सध्या ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (BBL) २०२२-२३ ही स्पर्धा खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या प्रतिष्ठेच्या टी-२० लीगमध्ये अनेक मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात रंगलेला सामना रंजक ठरला, ज्यात होबार्टने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्या दरम्यान फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडवर नाराज झाला होता. ज्यानंतर मॅथ्यू वेडने त्याची माफी मागितली.
या सामन्यात पर्थचा फलंदाज फाफ डू प्लेसिस त्रिफळाचित झाला. तो बाद झाल्यावर विरोधी संघाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडवर रागावलेला दिसत होता. खरे तर लक्ष्याचा पाठलाग करताना फाफला फिरकी गोलंदाज पॅट्रिक डूलीने त्रिफळाचित केले. परंतु बाद होण्यापूर्वी जेव्हा गोलंदाज डोलने चेंडू टाकला, तेव्हा फाफ शॉट मारण्याचा प्रयत्न करतन असताना, तेव्हा यष्टीरक्षक वेड बोल्ड म्हणाला. त्याच्यानंतर लगेच फाफ बोल्ड झाला. बाद होताच उजव्या हाताचा फलंदाज विरोधी यष्टीरक्षकावर रागावलेला दिसत होता. कारण यष्टीरक्षक वेडने त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता.
होबार्टचा कर्णधार असलेल्या वेडने याबाबत फाफची माफीही मागितली. त्याने चॅनल 7 ला सांगितले: “मला वाटते की तो निराश झाला होता. मला माहित नाही की, मी किती आधी बोल्ड म्हणालो होतो, परंतु त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.”
दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, होबार्टने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १७२ धावा केल्या. होबार्टकडून कर्णधार मॅथ्यू वेडने २९ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याच्याशिवाय टीम डेव्हिडने २८ चेंडूत नाबाद ४६ धावा करत उपयुक्त योगदान दिले.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पर्थचा संघ संपूर्ण षटक खेळल्यानंतर आठ गडी गमावून केवळ १६४ धावाच करू शकला. पर्थकडून यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिशने ३७ चेंडूत ६२ धावा केल्या. मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. पॅट्रिक डूलीने चार षटकांत १६ धावा देत चार बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.