चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना आयपीएल स्पर्धेतून काढून न टाकण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे बीसीसीआयने स्वागत केले आहे. तसेच सुनील गावसकर यांचा बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष म्हणून स्वीकार केला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, ‘‘खेळाचे हित जपण्यासाठी व क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी होऊ नये यासाठी न्यायालयाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही पालन करणार आहोत. श्रीनिवासन यांनीही मंडळाच्या कायदेशीर तज्ज्ञांबरोबर सविस्तर चर्चा करून अध्यक्षपद सोडण्याची व न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची यापूर्वीच तयारी दर्शविली होती. आयपीएलमध्ये सर्व आठ संघ राहणार आहेत, ही स्पर्धेच्या दृष्टीने हितकारक गोष्ट आहे. त्यामुळे ही स्पर्धा होणार हे निश्चित झाले आहे.’’ भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या प्रकरणात गोवणे अयोग्य आहे, असे ते पुढे म्हणाले.
आयपीएलखेरीज अन्य गोष्टींची जबाबदारी सांभाळणारे मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवलाल यादव म्हणाले, ‘‘माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी हे काम करणार आहे.’’
आयपीएलविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, ‘‘आयपीएलची सर्व जबाबदारी सुनील गावस्कर यांच्याकडे दिली असल्यामुळे मी त्याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.’’     

Story img Loader