कायद्याची चौकट न भेदण्याच्या हेतूने एन. श्रीनिवासन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदावरील पुनरागमन टाळले. परंतु रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या सभेला मात्र त्यांनी हजेरी लावली. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबरला चेन्नईत होणार असून या सभेचे अध्यक्षस्थान मी भूषविणार आहे, असे श्रीनिवासन यांनी या वेळी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले.
‘‘मी नेहमीच चिंतामुक्त असतो. त्यामुळे मला नेमकी समस्या काय आहे, हेच कळत नाही. मी काही चुकीची कृती केली आहे का? माझ्यावर कोणता आरोप आहे किंवा एखादा खटला सुरू आहे का?,’’ असा सवाल श्रीनिवासन यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर विचारला. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे पायउतार झालेले श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर रविवारी पुन्हा विराजमान होणार अशी जोरदार चर्चा होती. परंतु ते तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यकारिणी सभेला उपस्थित होते. तथापि, अंतरिम अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीच कार्यकारिणी सभेचे अध्यक्षस्थान भूषवून मंडळाच्या वार्षिक ताळेबंदाला मंजुरी दिली. चेन्नईत होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत दालमिया बीसीसीआयचे दैनंदिन कामकाज पाहतील, असा निर्णय कार्यकारिणी समितीने घेतला होता.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेद्वारे पुन्हा अध्यक्षपदाचा दुसरा डाव सुरू करण्यास श्रीनिवासन उत्सुक आहेत. परंतु कायदेशीर अडचणींवर मात करूनच त्यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न पुन्हा साकारू शकते. मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयने नेमलेल्या आयपीएल चौकशी समितीला ‘बेकायदेशीर आणि घटनाबाह्य़’ ठरवले होते. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सदर सुनावणी पुढे ढकलल्यामुळे श्रीनिवासन यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी श्रीनिवासन आणि बीसीसीआय यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे. याशिवाय बिहार क्रिकेट असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी नवी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीमध्ये २ ऑगस्टला झालेल्या मागील कार्यकारिणी समितीच्या बैठकीत श्रीनिवासन अध्यक्षपदावर परतण्याची चिन्हे होती. परंतु तांत्रिक कारणास्तव ती बैठक रद्द करण्यात आली होती.
श्रीनिवासन शनिवारीच कोलकाताला पोहोचणार होते. परंतु ते रविवारी सकाळी येथे दाखल झाले. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष बिस्वरूप दे यांच्यासमवेत ते विमानतळावरून बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. बीसीसीआयच्या कायदेविषयक समितीशी चर्चा केल्यानंतर कार्यकारिणी समितीचे अध्यक्षपद न भूषविण्याचा निर्णय श्रीनिवासन यांनी घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा