BCCI honours Champions Trophy-winning Indian team with cash Prize: भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या करंडकावर आपलं नाव कोरलं. भारतीय संघाने या विजयासह विक्रमी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी पटकावली आहे, जी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी बीसीसीआयने संपूर्ण संघावर पैशांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयने आज २० मार्च रोजी विजेत्या भारतीय संघासाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉपी २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहत जेतेपदावर कब्जा केला. विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे भारतासाठी सर्वात मोठे हिरो ठरले आणि या खेळाडूंनी विजेतेपद मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर कर्णधार रोहित शर्माची अंतिम सामन्यातील खेळी मॅचविनिंग ठरली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आज २० मार्च रोजी खेळाडू आणि कोचिंग स्टाफसह स्पर्धेशी संबंधित सर्व संघ सदस्यांना ५८ कोटी रुपयांची बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. ही बक्षीस रक्कम खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आणि निवड समिती सदस्यांना सन्मानित करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे.

बीसीसीआयने बक्षीस जाहीर करण्यासाठी एक निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील विजयानंतर टीम इंडियासाठी ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करताना बीसीसीआयला आनंद होत आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
बोर्डाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. भारतीय संघाने चार दमदार विजयांसह अंतिम फेरी गाठली. संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध नेत्रदीपक विजय नोंदवला. त्यांनी न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव करून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि अखेर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.
गेल्या वर्षी भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आपली तिजोरी उघडली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी बोर्डाने १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही बक्षिसाची रक्कम सर्व खेळाडू, निवडकर्ते, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफमध्ये वाटण्यात आले.