Indian Squad for Australia Series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक २०२३ उंचावला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले. त्याचबरोबर आठव्यांदा आशियाई चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. आशिया चषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आता भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारताला मायदेशात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ सदस्य असलेल्या संघाची घोषणा आधीच केली आहे. आता बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी १५ सदस्यांचा समावेश असलेला संघ जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना विश्रांती दिली आहे. रोहितच्या जागी के. एल. राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तर रवींद्र जडेजा संघाचा उपकर्णधार असेल. यासह भारतीय संघात अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचं संघात पुनरागमन झालं आहे.

एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडिया आपल्या तयारीची आणि खेळाडूंची पूर्ण चाचणी घेईल. ही मालिका २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून मालिकेतला दुसरा सामना २४ सप्टेंबरला होणार आहे.

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठीचा भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा, (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल (दुखापतीतून सावरल्यानंतर)

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना – २२ सप्टेंबर – मोहाली – दुपारी ३ वाजता.
दुसरा एकदिवसीय सामना- २४ सप्टेंबर- इंदूर – दुपारी ३ वाजता.
तिसरा एकदिवसीय सामना- २७ सप्टेंबर- राजकोट – दुपारी ३ वाजता.

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announce india squad for odi series against australia kl rahul captain rohit virat rested asc