बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संघात आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदरबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, संजू सॅमसन अशा दिग्गज युवा खेळाडूंचादेखील या संघात सावेश करण्यात आला आहे.
येत्या २६ आणि २८ जून रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने एकूण १७ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स या संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या नेतृत्वात त्याने संघाच्या पदार्पणातच जेतेपद पटकावले होते. तसेच या स्पर्धेत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात दिमाखदार कामगिरी करुन दाखलेली होती. याच कारणामुळे बीसीसीआयने त्याच्यावर आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आहे.
हेही वाचा >>> सचिन तेंडुलकरनंतर उमरान मलिककडून सुनील गावसकरांना अपेक्षा; काय म्हणाले लिटल मास्टर?
यावेळी युवा खेळाडूंना संधी, वरिष्ठांना विश्रांती
बीसीसीआये आयर्लंडविरोधातील टी-२० मालिकेसाठी हार्दिक पांड्यासोबत युवा खेळाडूंची फळी दिली आहे. या संघात त्याच्यासोबत इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, युझवेंद्र चहल तसेच अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्यासारखे तरुण खेळाडू असतील. तर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू या खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> नीरज चोप्राची ऑलिम्पिकपेक्षा सरस कामगिरी, मोडला राष्ट्रीय विक्रम; पाहा Video
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी पटेल. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक