BCCI Announces Prize Money for India U19 Women’s World Cup Winning Team: भारताच्या अंडर-१९ महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. कर्णधार निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने रविवारी २ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून सहज पराभव केला. क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यातील विजयासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिनियर खेळाडूंप्रमाणे वरिष्ठ आयसीसीने हे विजेतेपद जिंकण्यासाठी विजेत्या संघाला कोणतेही रोख बक्षीस दिले नाही, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाला कोट्यवधीचं बक्षीस जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या विजयाचा आनंद व्यक्त करत देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यानंतर बीसीसीआयने सोशल मीडिया पोस्टमध्ये खेळाडूंच्या यशाचा उल्लेख करत ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. संघातील सर्व १५ खेळाडू, मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खदीर आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांमध्ये हे बक्षीस वितरित केले जाईल. नूशीन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२३ मध्ये याच स्पर्धेच्या पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले होते.

अंडर-१९ विश्वचषक जिंकल्याबाबत टीम इंडियाला ICC कडून ट्रॉफीसह मेडल देण्यात आली, पण रोख बक्षीस मिळाले नाही. याचे कारण म्हणजे १९ वर्षांखालील स्तरावरील विश्वचषक स्पर्धेत विजेत्या संघाला आयसीसी बक्षीसाची रक्कम देत नाही. हा नियम पुरुषांच्या अंडर-१९ विश्वचषकासाठी लागू होतो. यापूर्वी २०२३ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघालाही नियमानुसार आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम मिळाली नवह्ती आणि तेव्हाही बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले होते.

भारताने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याता निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजांपुढे संघाचे फलंदाज निष्प्रभ दिसून आले. भारतीय फिरकी आक्रमणासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २० षटकांत अवघ्या ८२ धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून जी त्रिशाने सर्वाधिक ३ विकेट घेतले.

गोलंदाजीत चमकदार कामगिरीनंतर त्रिशाने फलंदाजीत नाबाद ४४ धावांच्या जलद खेळीच्या जोरावर भारताला मोठा विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली. भारताने अवघ्या १२ षटकांत ९ गडी राखून विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत ३०९ धावा आणि ७ विकेट अशा उत्कृष्ट कामगिरीसाठी त्रिशाला सामनावीर तसेच टूर्नामेंटची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.