IPL 2025 BCCI Took Historic Decision: IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना फ्रँचायझींच्या करारानुसार पैसे दिले जातात. तर प्रत्येक सामन्यासाठी वेगळी मॅच फी खेळाडूंना दिली जात नव्हती. आता आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही वेगळी मॅच फी मिळणार आहे. म्हणजेच लिलावात खेळाडूंना मिळणारे पैसे वेगळे असतील तर त्यांना मॅच फीच्या रूपात अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. आयपीएल २०२५ पूर्वी बीसीसीआयने घेतलेला हा एक मोठा पुढाकार आहे, जो खेळाडूंसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय शाह यांनी शनिवारी जाहीर केले की, संघात असलेल्या खेळाडूंना सामन्याची फी म्हणून ७.५ लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, सर्व लीग सामने खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त १.०५ कोटी रुपये मिळतील.

जय शाह यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “आयपीएलमधील सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरी कायम राहण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, आमच्या क्रिकेटपटूंसाठी प्रति सामना ७.५ लाख रुपये मॅच फी लागू करताना आम्हाला आनंद होत आहे. एका हंगामात सर्व लीग सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त १.०५ कोटी रुपये मिळणार आहे. प्रत्येक फ्रँचायझीला या हंगामासाठी १२.६० कोटी रुपये मॅच फी म्हणून देण्यात येईल. आयपीएल आणि आमच्या खेळाडूंसाठी हे नवीन पर्व आहे.”

इंडियन प्रीमियर लीगला २००८ मध्ये सुरूवात झाली आणि तेव्हापासून २०२४ पर्यंत, खेळाडूंना समान रक्कम दिली गेली ज्यासाठी ते करारबद्ध होते. यासाठी खेळाडूंना वेगळी मॅच फी देण्यात आली नव्हती, मात्र या घोषणेनंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त मॅच फी देखील दिली जाणार आहे. ज्या खेळाडूंना कमी किमतीत करारबद्ध केले जाते, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. एवढेच नाही तर या लीगबद्दल खेळाडूंमध्ये अधिक उत्साह वाढेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announces historic match fees of 7 05 lakhs to players to get additional 1 05 crore for playing all matches bdg