भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने नवीन वर्षासाठी आपल्या खेळाडूंसाठी आर्थिक कराराची यादी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनातही तब्बल २०० टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे.

सिनीअर खेळाडूंसाठी बीसीसीआयने यंदाच्या वर्षी A+ हा नवीन गट तयार केला आहे. या यादीत अवघ्या ५ खेळाडूंचं नाव समाविष्ट करण्यात आलं असून प्रत्येक खेळाडूसोबत वार्षिक ७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.

A+ श्रेणीतील खेळाडू – विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार

याव्यतिरीक्त A गटातील खेळाडूंसोबत वार्षिक ५ कोटी रुपयांचा करार करण्यात येणार आहे. कसोटी आणि वन-डे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व महत्वाच्या खेळाडूंना या श्रेणीत स्थान देण्यात आलेलं आहे.

A श्रेणीतील खेळाडू – महेंद्रसिंह धोनी, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, वृद्धिमान साहा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे.

मधल्या फळीतले फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी बीसीसीआयने B गट तयार केला असून या गटातील खेळाडूंसोबत वार्षिक ३ कोटी रुपयांचा करार करण्यात येणार आहे.

B श्रेणीतील खेळाडू – उमेश यादव, लोकेश राहुल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक.

बीसीसीआयच्या सर्वात शेवटच्या गटातील म्हणजेच C गटातील खेळाडूंनाही चांगली रक्कम मिळणार आहे. बीसीसीआय या गटातील खेळाडूंसाठी वार्षिक १ कोटी रुपयांचा करार करणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला कोणत्याही यादीत स्थान देण्यात आलेलं नाहीये. मिळालेल्या माहितीनूसार बीसीसीआयने शमी सोबतचा करार सध्या राखून ठेवल्याचं समजतंय.

C श्रेणीतील खेळाडू – सुरेश रैना, केदार जाधव, मनिष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, पार्थिव पटेल, जयंत यादव.

सिनीअर महिला खेळाडूंसाठी यंदा बीसीसीआयने C हा एक नवीन गट तयार केला आहे. याआधी महिला क्रिकेटसाठी A आणि B हे दोन गटच अस्तित्वात होते. A गटातील महिला खेळाडूंना ५० लाथ, B गटातील महिला खेळाडूंना ३० लाख तर C गटातील महिला खेळाडूंसोबत १० लाखांचा करार करण्यात येणार आहे.

Story img Loader