भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला आयपीएलच्या २०२३ ते २०२७ या हंगामासाठी मीडिया हक्कांसाठी निविदा जारी केली आहे. मंडळाने शुक्रवारी (९ डिसेंबर) प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. तसेच ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत निविदा फॉर्म खरेदी करता येतील. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, “आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल महिला आयपीएल सीझन २०२३-२०२७ साठी निविदा प्रक्रियेद्वारे मीडिया अधिकार सुरक्षित करण्यासाठी नामांकित संस्थांकडून बोली आमंत्रित करते.”
मीडिया अधिकारांचा लिलाव कसा होणार?
सीलबंद लिफाफ्यांमधून एकाच वेळी बोली लावली जाईल की ई-लिलाव होईल याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पुरुषांच्या आयपीएलचे मीडिया हक्क ई-लिलावाद्वारे विकले गेले. यामध्ये सातत्याने बोली वाढत होत्या.
फॉर्मची किंमत पाच लाख रुपये –
निविदा (ITT) बोली दस्तऐवजासाठी आमंत्रणाची किंमत ५ लाख रुपये आहे. याशिवाय कराची रक्कमही त्यात जोडली जाणार आहे. बोली सबमिट करू इच्छिणाऱ्या कोणत्याही पक्षाने हा फॉर्म खरेदी करणे आवश्यक आहे. आयटीटीमध्ये विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणारेच बोलीसाठी पात्र असतील. हे स्पष्ट केले आहे की, केवळ आयटीटी खरेदी केल्याने एखाद्या व्यक्तीला बोली लावता येत नाही.
पुरुषांच्या आयपीएलच्या मीडिया हक्कातून बीसीसीआयने करोडोंची कमाई केली आहे –
बीसीसीआयने या वर्षाच्या सुरुवातीला पुरुषांच्या आयपीएलचे मीडिया हक्क विकले. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. बीसीसीआयने मीडियाला चार पॅकेजमध्ये विकले आहे. बोर्डाने एकूण ४८,३९० कोटी रुपयांना मीडिया हक्क विकले आहेत. स्टार इंडियाने २३, ७५८कोटी रुपयांना टीव्हीचे हक्क विकत घेतले.
त्याच वेळी, वायाकॉम १८ ने २३, ७५८ कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार मिळवले होते. वायाकॉमने पॅकेज-सीदेखील आपल्या नावे केले आहे. यासाठी त्यांनी २९९१ कोटी रुपयांची बोली लावली. त्याच वेळी, टाइम्स इंटरनेटसह वायकॉमने १३२४ कोटींना पॅकेज-डी विकत घेतले आहे. रिलायन्सच्या मालकीची वायाकॉम १८, ज्याला पॅकेज-डी अधिकार मिळाले आहेत, ते ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि यूकेमध्ये सामने प्रसारित करणार आहेत. त्याच वेळी, टाइम्स इंटरनेट मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका तसेच अमेरिका आणि उर्वरित जगामध्ये सामन्यांचे प्रसारण करेल.