प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यावरून भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआय यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. विश्वचषक २०१५ पर्यंत डंकन फ्लेचर यांच्याकडेच संघाची सूत्रे आहेत असे उद्गार धोनीने पत्रकार परिषदेत काढले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाची कारणमीमांसा करत बीसीसीआयने संघाच्या संचालकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करत फ्लेचर यांच्या अप्रत्यक्ष गच्छंतीचे संकेत दिले होते. मात्र फ्लेचर सर्वेसर्वा असल्याच्या धोनीच्या वक्तव्याने बीसीसीआयचे पदाधिकारी नाराज झाले आहेत.
‘‘धोनीने आपल्या अधिकाऱ्यांच्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे. संघाचा सूत्रधार कोण याविषयी बोलण्याची धोनीला काहीही आवश्यकता नाही. तो त्याच्या अधिकारातील विषय नाही,’’ असे मत बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. धोनीच्या या वक्तव्यावर बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचेही त्याने पुढे सांगितले.
या वक्तव्यामुळे धोनीच्या बीसीसीआयमधील वाढत्या प्रभावाविषयी चर्चाना उधाण आले आहे. जो प्रकार घडला तो निराशाजनक आहे. यावर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. ‘‘कर्णधार म्हणून त्याने मर्यादा ओलांडली आहे. प्रसारमाध्यमे त्याला विविध प्रश्न विचारणारच पण परिपक्व क्रिकेटपटू म्हणून त्याने भान राखायला हवे होते. ज्याप्रमाणे बीसीसीआयचे पदाधिकारी अंतिम अकरात कोण खेळणार हे ठरवत तसेच धोनीने कोण सर्वेसर्वा आहे आणि कधीपर्यंत आहे हे ठरवू नये,’’ असे वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. प्रशिक्षक किंवा त्याच्या सहयोगींची नियुक्ती ही धोनीच्या अधिकारकक्षेत येत नाही.
रवी शास्त्रीकडे संघाची संपूर्ण जबाबदारी असेल आणि डंकन फ्लेचर यांच्याकडे कोणतेच अधिकार नसतील, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी स्पष्ट केले होते. मात्र पत्रकार परिषदेत फ्लेचरच सूत्रधार आहेत आणि २०१५ विश्वचषकापर्यंत त्यांच्याकडेच सूत्रे असतील या धोनीच्या वक्तव्याने गदारोळ वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा