आयपीएल स्पॉट-फिक्सिंग खटल्यामुळे बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. बीसीसीआयच्या रविवारी झालेल्या तातडीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २ मार्चला चेन्नईत ही सभा होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यकारिणी सभेला उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करीत त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कार्यवाही करण्याबाबत या सभेत चर्चा करण्यात आली. २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने येत्या सहा आठवडय़ांत बीसीसीआयला वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. इंडिया सिमेंट्सच्या मालकीच्या चेन्नई सुपर किंग्जपासून पूर्णत: विलग झाल्याशिवाय श्रीनिवासन अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात बीसीसीआयच्या स्वायत्तेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबत मंडळाच्या सदस्यांनी नापसंती दर्शवली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन आता अध्यक्षपद भूषवण्यासाठी उत्सुक नसल्यामुळे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. जर निवडणूक झाली नाही तर, भारताचे माजी क्रिकेटपटू यादव हे बिनविरोधपणे अध्यक्षपदावर विराजमान होतील.
दरम्यान, कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये माजी क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या मासिक निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.