भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी आयपीएल हंगामापूर्वी बबल-टू-बबल ट्रान्सफर करण्यासाठी मान्यता दिली आहे. एका वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेचा भाग असणारे खेळाडू क्वारंटाइन न राहता आयपीएलच्या बायो-बबलमध्ये राहू शकतात.
बीसीसीआय म्हणाले, “भारत-इंग्लंड मालिकेचे खेळाडू थेट आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतात. फ्रेंचायझींना त्यांना थेट बस हॉटेल आणि चार्टर्ड फ्लाइट्सद्वारे टीम हॉटेलमध्ये नेण्याची व्यवस्था करावी लागेल. जर चार्टर्ड उड्डाणे असतील तर इतर सदस्यांना नियमांचे पालन करणे देखील अनिवार्य असेल.”
अहवालात असेही म्हटले आहे की, खेळाडूंनी कोरोना नियमांच्या प्रोटोकॉलचे योग्य पालन केल्याचे आढळले तर ते, खेळाडू आरटीपीसीआर चाचणी आणि क्वारंटाइनच्या नियमाशिवाय थेट बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतात.
बीसीसीआयच्या या निर्णयाचा फायदा दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेत सहभागी झालेल्या खेळाडूंना होणार आहे. जर फ्रेंचायझीने त्यांना चार्टर्ड विमानाने भारतात आणले तर, त्यांना क्वारंटाइनच्या नियमांपासून सूट मिळेल.
आयपीएलसाठी एकूण बारा बायो बबल
आयपीएलसाठी एकूण बारा बायो बबल तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ हे फ्रँचायजी आणि सहाय्यक कर्मचार्यांसाठी असतील. दोन बबल सामना अधिकारी आणि सामना व्यवस्थापन संघासाठी असतील. तर, दोन बबल प्रसारण समालोचकासांठी असतील.
बीसीसीआयने असेही म्हटले आहे की त्याचे अधिकारी आणि ऑपरेशन टीम कोणत्याही प्रकारच्या बबलचा भाग होणार नाहीत. यामुळे बीसीसीआयचे अधिकारी खेळाडू, टीम सपोर्ट स्टाफ, मॅच मॅनेजमेंट टीम आणि ब्रॉडकास्टिंग क्रूशी वैयक्तिकरित्या संपर्क साधू शकणार नाहीत.
आयपीएल पुढील महिन्यात 9 एप्रिलपासून सुरू होईल. ही स्पर्धा देशातील सहा शहरांमध्ये खेळवण्यात येईल. अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल.