BCCI Awards Ceremony in Hyderabad : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार सोहळा आज (२३ जानेवारी) हैदराबाद येथे होणार आहे. बीसीसीआयचा हा पुरस्कार सोहळा चार वर्षांनंतर आयोजित केला जाणार आहे. कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा थांबवण्यात आला होता. शेवटच्या वेळी हा सोहळा १३ जानेवारी २०२० रोजी मुंबईत झाला होता. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहची ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर’ म्हणून निवड झाली आणि त्याला ‘पॉली उमरीगर पुरस्कार’ देण्यात आला होता.
यावेळी चार वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर हा सोहळा आयोजित केला जात असताना, शुबमन गिल ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. यासोबतच टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भारतीय संघाचे सर्व खेळाडू उपस्थित राहणार नाहीत तर कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेला इंग्लिश संघही उपस्थित राहणार आहे.
समारंभ कधी आणि कुठे होणार?
बीसीसीआयचा हा पुरस्कार सोहळा मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता हैदराबादमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून या शहरात खेळवला जाणार आहे.
हेही वाचा – Shoaib Malik : ‘लग्न असो किंवा नो-बॉल, तो प्रत्येक काम तीनदा…’, शोएब मलिक सोशल मीडियावर होतोय ट्रोल
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
या पुरस्कार सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाच्या चॅनेलची घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
शुबमन गिल आणि रवी शास्त्री यांच्याशिवाय अनेक क्रिकेटपटूंनाही येथे पुरस्कार मिळणार आहेत. अनेक श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण केले जाईल. येथे सर्व श्रेणींबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही, परंतु काही अहवालांमध्ये, रणजी ट्रॉफीतील दमदार कामगिरीसाठी सरफराज खान आणि शम्स मुलाणी यांना देशांतर्गत क्रिकेटचे मोठे पुरस्कार दिले जातील, असे निश्चित करण्यात आले आहे.