BCCI bans Sumit Sharma for two years : रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात होताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला असून ओडिशाचा अष्टपैलू खेळाडू सुमित शर्मावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. सुमितवर बंदी घालण्याचे कारण म्हणजे वयाची फसवणूक. त्याची फसवणूक उघडकीस आल्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या शिस्तपालन समितीने सुमितवर २ वर्षांची बंदी घातली.
वयाची फसवणूक केल्याचा आरोप –
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सुमित शर्मावर वयाची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कटक, ओडिसात जन्मलेला २८ वर्षीय सुमित शर्मा हा अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा फिरकीपटू असण्यासोबतच तो उत्तम फलंदाजी करतो. सुमित शर्माच्या निलंबनानंतर ओडिशा क्रिकेट बोर्डाने तारिणी साचा संघात समावेश केला. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. सुमितने रणजी ट्रॉफीपूर्वी जन्म प्रमाणपत्र सादर केल्यावर त्याचे वय खोटे असल्याची माहिती समोर आली. खरेतर, त्यानी दिलेले जन्म प्रमाणपत्र २०१५-१६ हंगामात त्यांनी कनिष्ठ स्तरावर सादर केलेल्या प्रमाणपत्राशी जुळत नव्हते.
सुमती शर्मावर बंदी घातल्यानंतर, ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बहेरा यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, ‘ओडिशा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू सुमित शर्माला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत स्पर्धा खेळण्यास दोन वर्षांची बंदी घातली आहे. एकापेक्षा जास्त जन्म दाखले दिल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर ही बंदी घातली आहे. त्यांनी २०१५-१६मध्ये कनिष्ठ स्तरावर दिलेले जन्म प्रमाणपत्र सध्याच्या प्रमाणपत्रापेक्षा वेगळे आहे.’
हेही वाचा – Ambati Rayudu : राजकीय खेळपट्टीवर अंबाती रायुडू दोन आठवडेही टिकला नाही, वायएसआर काँग्रेसला रामराम
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ओडिशा क्रिकेट असोसिएशनने सुमित शर्माच्या जागी नियुक्ती जाहीर केली आहे. ओडिसाने त्याच्या जागी तारिणी साची निवड केली असून तोही संघात सामील झाला आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ओडिशा आणि बडोदा आमनेसामने आहेत. या सामन्यात बडोद्याने पहिल्या डावात ४५० हून अधिक धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात ओडिशाने १५० धावांच्या आत ७ विकेट्स गमावल्या होत्या.