आयपीएलमधील धक्कादायक ‘स्पॉट-फिक्सिंग’ कांडामुळे क्रिकेटजगत हादरले आहे. त्यामुळे आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेची प्रतीमा डागाळली आहे. या पाश्र्वभूमीवर रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. ‘‘रविवारी चेन्नईच्या पार्क शेरेटॉन हॉटेलमध्ये सकाळी ११ वाजता बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक आयोजित केली आहे,’’ असे बीसीसीआयने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
‘‘स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे,’’ असे पुढे म्हटले आहे.‘‘अमित सिंग हा गुजरात क्रिकेट असोसिएशनचा नोंदणीकृत खेळाडू आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अमितची चौकशी सुरू असल्यामुळे त्याला बीसीसीआयकडून निलंबित करण्यात येत आहे,’’ असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आमच्याही मर्यादा आहेत -बीसीसीआय
नवी दिल्ली : ‘स्पॉट-फिक्सिंग’सारखे प्रकार रोखण्याकरिता आमच्याकडे राज्य किंवा सरकारी पातळीवर कोणताही संस्था नाही. पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा नाही. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकासोबत आम्ही काम करत असलो तरी आमच्याही मर्यादा आहेत, असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘रणजी आणि कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी ‘स्पॉट-फिक्सिंग’ केले आहे. ही आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपण काय करत आहोत, याची कल्पना त्यांना नसावी. पण चुकीचे कृत्य करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. श्रीशांतला शिस्तपालन समितीच्या चौकशीला सामोरे जावे लागेल. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा