BCCI Central Contract 5 New Players Icluded in List : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा थरार रंगत असून दुसऱ्या बाजूला या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दखल घेतली आहे. बीसीसीआयने १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या क्रिकेट हंगामासाठी टीम इंडियाशी करारबद्ध (सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने वार्षिक करार केलेल्या एकूण ३४ खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अ+, अ, ब आणि क अशा चार श्रेणी असून त्यामध्ये खेळाडूंचं वर्गीकरण केलं आहे. यामध्ये अनेक तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यंदा पाच नव्या खेळाडूंनी बीसीसीआयचं वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे.

देशांतर्गत क्रिकेट, इंडियन प्रीमियर लीग व भारतीय संघात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणाऱ्या, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वरुण चक्रवर्ती व आकाश दीप या खेळाडूंना बीसीसीआयने करारबद्ध केलं आहे. या खेळाडूंचा पहिल्यांदाच या करारात समावेश करण्यात आला आहे.

हर्षित राणा

गेल्या वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी हर्षित राणाचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. त्याच दौऱ्यावेळी त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. तसेच तो चॅम्पियन्स करंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा देखील भाग होता. हर्षितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ बळी घेतले आहेत.

नितीश कुमार रेड्डी

नितीश कुमार रेड्डी आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करू शकलेला नाही. मात्र, त्याने मेलबर्न कसोटीत ठोकलेल्या शतकामुळे त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागली होती. टी-२० क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करतोय. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेट व कसोटी क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे. गोलंदाजीतही त्याने ८ बळी घेतले आहेत. बीसीसीआयने त्याचा पहिल्यांदाच वार्षिक करारात समावेश केला आहे.

वरुण चक्रवर्ती

गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर वरुण चक्रवर्तीचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. त्याने गंभीरचा विश्वास सार्थ ठरवत टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वरुणने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक बळी घेतले होते.

आकाश दीप

जलदगती गोलंदाज आकाश दीप भारताच्या कसोटी संघातील महत्त्वाचा गोलंदाज बनू शकतो. त्याने नुकत्याच खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आकाश उत्तम इन स्विंग व आउट स्विंग गोलंदाजी करतो. त्याला आगामी इंग्लंड दौऱ्यातही संधी मिळू शकते.

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेनंतर भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० शतक देखील आहे. रोहित शर्माच्या टी-२० मधील निवृत्तीनंतर त्याने आता रोहितची सलामीची जागा घेतली आहे. त्यानंतर आता त्याला बीसीसीआयने वार्षिक करारात समाविष्ट केलं आहे. फलंदाजीसह अभिषेस़क डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी देखील करतो.