BCCI Central Contract 9 Players Removed from List : आयपीएल २०२५ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या क्रिकेट हंगामासाठी टीम इंडियाशी करारबद्ध (सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने यावेळी एकूण ३४ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. अ+, अ, ब आणि क अशा चार श्रेणींमध्ये या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनेक तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, बीसीसीआयने नऊ खेळाडूंना या यादीतून वगळलं आहे. तर, श्रेयस अय्यर व इशान किशनने बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिमाखात प्रवेश केला आहे.
बीसीसीआयने ९ खेळाडूंना वार्षिक करारातून वगळलं आहे. यामध्ये आर. अश्विन (निवृत्त), शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, के. एस. भरत, आवेश खान, विजयकुमार वैशाख, उम्रान मलिक, यश दयाल व विदवथ कावेरप्पा यांचा समावेश आहे. शार्दुल व भरत हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. मागील काही मालिकांमध्ये निवड समितीने त्यांची निवड केलेली नाही. त्यामुळे त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे. तर, जितेश शर्मा मिळालेल्या संधीचं सोनं करू शकला नाही. त्यामुळे त्याचाही करार रद्द करण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीने गेल्या वर्षी आकाश दीप, विजयकुमार वैशाख, उम्रान मलिक, यश दयाल व विदवथ कावेरप्पा या जलदगती गोलंदाजांशी देखील करार केला होता. त्यावेळी यांच्यासाठी फास्ट बोलिंग कॉन्ट्रॅक्ट ही वेगळी श्रेणी तयार करण्यात आली होती. मात्र यावेळी बीसीसीआयने असं केलेलं नाही. ही श्रेणीच वगळण्यात आली आहे. त्यामुळे आकाश दीप वगळता या श्रेणीतील इतर खेळाडू देखील बीसीसीआयच्या वार्षिक करारातून बाहेर पडले आहेत. आकाश दीपचा क श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

करारबद्ध खेळाडूंची यादी

  • अ+ श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
  • अ श्रेणी : ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल, शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी.
  • ब श्रेणी : श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव.
  • क श्रेणी : इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा, सर्फराझ खान, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती वर हर्षित राणा.