गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम केला आहे. खेळाचा कोणताही प्रकार असला तरी भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टीरक्षण या सर्वच आघाडीवर सरस ठरत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघाचा आलेख उंचावत असताना, बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
भारतीय क्रिकेट संघ डोपिंगच्या (उत्साहवर्धक इंजेक्शन) विळख्यात अडकल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू स्वत:ला फीट ठेवण्यासाठी इंजेक्शन घेतात. ही बाब बीसीसीआयला माहीत असूनही क्रिकेट बोर्डाकडून याकडे कानाडोळा केला जातो, असा धक्कादायक खुलासा चेतन शर्मा यांनी केला आहे. ‘झी न्यूझ’ने छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे.
यावेळी चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेटर्स कशा पद्धतीने निवड समितीला खूश ठेवतात, याबाबतही खुलासा केला आहे. शिवाय विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यातील वादावरही चेतन शर्मा यांनी भाष्य केलं आहे. सौरभ गांगुली यांच्यामुळेच विराट कोहलीला कर्णधारपद सोडावं लागलं, असंही चेतन शर्मा यांनी सांगितलं.