भारतीय फलंदाज विराट कोहली याचं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. कर्णधार पदावरून हटवण्यापूर्वी दीड तास आधी विराटला याची कल्पना देण्यात आली होती. याचा खुलासा विराट कोहलीने स्वत: केला होता. विराट कोहलीला असं अचानक कर्णधारपदावरून हटवल्याने क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता. पण विराटला कर्णधार पदावरून हटवणारा खरा मास्टरमाइंड कोण होता? याचा खुलासा एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं ‘झी न्यूझ’ने स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.विराट कोहलीला कर्णधार पदावरून कसं हटवण्यात आलं, याच्या मागील पार्श्वभूमीही सांगितली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याबरोबर विराट कोहलीचा वाद होता. या वादातूनच विराटला कर्णधार पदावरून काढण्यात आलं, असा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे.
कोहली आणि गांगुली यांच्यात अहंकाराचा वाद होता. स्वत:चं कर्तृत्व क्रिकेटपेक्षा मोठं आहे, असं विराटला वाटत होतं. यामुळे दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. ८ डिसेंबर २०२१ रोजी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची घोषणा केली होती. यामध्ये विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार होता, पण एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून त्याला हटवलं होतं. विराटच्या जागी रोहितला कर्णधार पद दिलं होतं. संघ जाहीर करण्याच्या दीड तास आधी आपल्याला कर्णधार पदावरून हटवलं आहे, याची माहिती विराटला देण्यात आली. याचा खुलासा कोहलीने स्वत: एका पत्रकार परिषदेतून केला आहे.
चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट आणि रोहित यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. दोघांमध्ये कसलाही वाद नसून विराट आणि रोहित दोघं एकमेकांना चांगली साथ देतात. दोघांत वाद असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात. पण विराटचा फॉर्म खराब असताना रोहितने त्याला चांगली साथ दिली होती. तर रोहितचा फॉर्म खराब असताना विराटही त्याला साथ देत होता, असा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे. संबंधित दाव्याची ‘लोकसत्ता’ पुष्टी करत नाही.