आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट टी-२० लीग आहे. ही लीग चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करत असते. आता पुढच्या वर्षी चाहत्यांच्या मनोरंजनात अधिक भर पडणार आहे. आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश होणार आहे. ऑगस्टपर्यंत या संघाच्या निविदा बीसीसीआय मागवू शकतात. यामुळे बीसीसीआयलाही मोठा पैसा मिळणार आहे. आतापर्यंत आठ संघ आयपीएलमध्ये उतरले आहेत.

यंदाचा आयपीएल हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. ६० पैकी २९ सामने झाले आहेत. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये बीसीसीआय दोन नवीन संघांसाठी निविदा काढू शकते. ऑक्टोबरपर्यंत दोन नवीन संघ समोर येतील. गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ फ्रेंचायझी यात पुढे आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही १५ ते ३० सामन्यांनी वाढेल.

आयपीएलचे स्वरूपही बदलणार

आयपीएलचे स्वरूपही बदलणार आहे. बीसीसीआआय ९४ सामने खेळवण्याच्या तयारीत नाही, ते ७४ सामन्यांच्या निर्णयाबाबत घोषणा करू शकतात. असे केल्याने २०११मध्ये जसे आयपीएल खेळवले गेले, तेच स्वरुप पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. त्यामुळे १० संघांना ५-५च्या गटात विभागले जाईल. जर फ्रेंचायझीने तीन खेळाडू संघात ठेवले, तर त्यांचे मानधन १५  कोटी, ११ कोटी आणि ७ कोटी असे असेल. दोन खेळाडू ठेवले, तर त्यांचे मानधन १२.५ कोटी आणि ८.५ कोटी असेल.

हेही वाचा क्रिकेट समालोचकांमुळे निर्माण झालेले ‘हे’ वाद तुम्हाला माहीत आहेत का?

डिसेंबरमध्ये होणार मेगा ऑक्शन

माध्यमांच्या वृत्तानुसार,, बीसीसीआय डिसेंबरच्या मध्यात आयपीएलचे मेगा ऑक्शन घेऊ शकते. म्हणजेच, खेळाडूंचा नव्याने लिलाव केला जाईल. सर्व संघ ४ खेळाडू ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे. ऑक्शन कुठे प्रसारित होणार, हे अजून गुलदस्त्यात आहे.

५० नवीन खेळाडूंना संधी मिळेल

आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. अशा परिस्थितीत दोन नवीन संघांच्या समावेशासह, टी-२० लीगमध्ये जास्तीत जास्त ५० नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. एका संघात जास्तीत जास्त ८ विदेशी खेळाडू असू शकतात. अशा परिस्थितीत ३४ देशांतर्गत आणि १६ विदेशी खेळाडू नव्या फ्रेंचायझीचा भाग बनू शकतात. आयपीएलची सुरुवात २००८ पासून झाली. त्यानंतर, जगातील सर्व प्रमुख देश त्यांच्या स्वतःच्या टी-२० लीगचे आयोजन करत आहेत.

Story img Loader