भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट पंचांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच्या त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा उपक्रम सुरू केला आहे. बीसीसीआयने खेळाडूंप्रमाणे पंचांसाठी ‘ए प्लस’ श्रेणी सुरू केली आहे. ए प्लस आणि ए श्रेणीतील पंचाना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सामन्यातील प्रत्येक दिवसासाठी ४० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनेलचे सदस्य नितीन मेनन यांच्यासह इतर १० पंचांचा ए प्लस गटामध्ये सहभाग करण्यात आला आहे. या गटामध्ये अनिल चौधरी, मदनगोपाल जयरामन, वीरेंद्र कुमार शर्मा आणि केएन अनंतपद्मभानन या चार आंतरराष्ट्रीय पंचांना स्थान देण्यात आले आहे. रोहन पंडित, निखिल पटवर्धन, सदाशिव अय्यर, उल्हास गांधी आणि नवदीप सिंग सिद्धू हे देखील ए प्लस गटाचा भाग आहेत. याशिवाय, अ गटात २०, ब गटात ६०, क गटात ४६ आणि ड गटामध्ये ११ पंच आहेत.
ए प्लस आणि ए गटातील पंचांना प्रथम श्रेणी सामन्यासाठी दररोज ४० हजार रुपये आणि बी व सी गटातील पंचांना प्रतिदिन ३० हजार मानधन मिळणार आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “ए प्लस हा नवीन गट तयार करण्यात आला आहे. ए प्लस आणि ए या गटातील पंच सर्वात उत्कृष्ट जथ्था समजला जाईल. ब आणि क वर्गातही चांगलेच पंच आहेत. फक्त जबाबदारी वाटून देणे सोयीस्कर व्हावे आणि गुणवत्ता आणखी सुधरावी यासाठी आणखी एक गट तयार करण्यात आला आहे.
बीसीसीआय अधिकारी म्हणाला, “इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय पंचांच्या दर्जावर अनेकदा टीका झाली आहे. भारतातील फक्त एक भारतीय पंच आयसीसी एलिट पॅनेलचा भाग आहे. सर्व पातळ्यांवर पंचांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला गेला पाहिजे.”