भारतीय क्रिकेटविश्वात येऊ घातलेल्या ‘वॅग्स’ (वाइफ अॅण्ड गर्लफ्रेंड) संस्कृतीला बीसीसीआयच्या नव्या निर्णयामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे. इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ असा सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघव्यवस्थापनाने अनेक कठोर निर्णय अंमलात आणण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय व्यवस्थापनाने भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसीला परदेशातील क्रिकेट दौऱ्यावर सोबत आणण्यास मुभा दिली होती. त्यानंतर इंग्लड दौऱ्यावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एकत्र राहण्यास बीसीसीआयने परवानगी दिली होती. मात्र, या दौऱ्यात विराटच्या बॅटमधील धावांचा ओघ आटल्यामुळे भारतीय संघ आणि बीसीसीआय यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यामुळे एकूणच सगळी परिस्थिती ध्यानात घेता, बीसीसीआयने घेतलेल्या पूर्वीच्या निर्णयात बदल करण्यात येणार आहे. नव्या निर्णयानुसार संघातील खेळाडूंना त्यांच्या प्रेयसीला बरोबर आणता येणार नाही. विवाहित असणाऱ्या खेळाडूंना यापूर्वी परदेश दौऱ्यावर असताना, स्वत:च्या पत्नीला सोबत आणण्याची परवानगी होती. ही परवानगी कायम ठेवण्यात आली असली तरी, आता खेळाडूंना एका विशिष्ट कालावधीपर्यंतच त्यांच्या पत्नीसोबत राहता येणार आहे. मात्र, हा कालावधी नक्की किती असेल, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
इंग्लडविरुद्ध झालेल्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज स्विंग गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकताना दिसले. चिंतेची बाब म्हणजे भारतीय फलंदाज प्रत्येक वेळी एकाच पद्धतीच्या चुका करून बाद होताना दिसले. शेवटच्या कसोटीत तर भारतीय खेळाडूंनी स्लीपमधील गचाळ क्षेत्ररक्षणाचा नवा अध्याय रचून ठेवला.

Story img Loader