क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अनेकदा ड्रग्स किंवा उत्तेजक द्रव्यांचा आधार घेतला जातो, हि क्रीडाविश्वाची काळी बाजू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा स्थानिक पातळीवर मोठ्या स्पर्धांच्या आधी अनेकदा काही खेळाडू अशा उत्तेजक द्रव्याचा आधार घेतात. त्यामुळे अनेकदा संघटनांकडून डोपिंग चाचणी केली जाते. अशाच एका डोपिंग म्हणजेच उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत भारतातील एक क्रिकेटपटू दोषी आढळला आहे.

पंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता बीसीसीआयने घेतलेल्या डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. विशेष म्हणजे पंजाबकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यातच त्याने द्विशतक केले होते. दरम्यान, चाचणीत दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयकडून त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

 

 

पंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता

 

एका स्थानिक टी२० स्पर्धेसाठी बीसीसीआयने ही चाचणी घेतली होती. त्यानुसार १५ जानेवारी रोजी अभिषेकने आपले युरीन सॅम्पल चाचणी घेणाऱ्या समितीकडे दिले. या नमुन्यात टर्ब्युटलाईन या उत्तेजक द्रव्याचे त्याने सेवन केले असल्याचे चाचणीदरम्यान दिसून आले. हे द्रव्य सहसा खोकल्यासाठी असलेल्या कफ सिरपमध्येही थोड्या प्रमाणात आढळून येते. ‘वाडा’च्या यादीत या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

अभिषेकने रणजी सामन्यात पदार्पण करताना पंजाबकडून पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याने त्या सामन्यात २०२ धावा केल्या होत्या. दरम्यान, त्याच्या निलंबनाचा कालावधी १४ सप्टेंबर २०१८ पर्यंत असणार आहे. अशाच प्रकारच्या उत्तेजक द्रव्य सेवनामुळे युसूफ पठाणावरही बंदी घालण्यात आली होती.

Story img Loader