अर्धवट दौरा सोडलेल्या वेस्ट इंडिज संघावर कोणती कारवाई करायची आणि आपली बाजू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) कशी मांडायची, हे सर्व ठरवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीची बैठक मंगळवारी होणार आहे. बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी आयपीएलच्या गव्हर्निग कौन्सिलची बैठक होणार असून यामध्ये स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर कोणती कारवाई करायची आणि त्यांच्यावर किती दंड आकारायचा, यावर कार्यकारिणी चर्चा करणार आहे. अर्धवट दौरा सोडल्यामुळे बीसीसीआयची झालेली समस्या त्यांना कळावी यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर कडक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो.
‘‘वेस्ट इंडिजने दौरा अर्धवट सोडल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने करावी, अशी मागणी आम्ही आयसीसीकडे करणार आहोत. त्याचबरोबर भारत आणि वेस्ट इंडिज या उभय देशांमधील मालिका भविष्यात खेळवायची की नाही, हेदेखील आम्ही या बैठकीमध्ये ठरवणार आहोत,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.

Story img Loader