मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणारा विश्वचषक तोंडावर आलेला असताना, भारतीय संघाचं गणित काहीकेल्या जुळताना दिसत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारतीय संघाचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. विश्वचषकासाठी संघ निवडताना आता बीसीसीआयच्या निवड समितीसमोर अवघ्या 10 सामन्यांचा पर्याय आहे. मात्र गेल्या काही सामन्यांमधलं सलामीवीरांचं अपयश, मधल्या फळीतली बेभरवशी फलंदाजी आणि हार्दिक पांड्या-लोकेश राहुलवर घातलेली बंदी यामुळे बीसीसीआय आता विश्वचषकासाठी पर्यायांचा विचार करत असल्याचं समजतं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतला विश्वचषकासाठी तयार रहा असे आदेश दिल्याचं समजतं आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी वन-डे सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजीसाठी येते. मात्र आतापर्यंत त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिलेलं नाहीये. रोहित शर्माने काही सामन्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. याचसोबत मधल्या फळीत अंबाती रायडूच्या बॅटमधून धावांचा आटलेला ओघ हा देखील संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. त्यामुळे बीसीसीआयने अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांची, इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारत अ संघात निवड केली आहे. पहिल्या 3 सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे भारत अ संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यातच हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवर लागलेली बंदी नेमकी कधी उठेल याबाबतचं चित्रही अजुन स्पष्ट झालेलं नाहीये.

पंतने आतापर्यंत 3 वन-डे सामन्यांमध्ये 41 धावा केल्या आहेत. मात्र अंबाती रायडू फॉर्मात न आल्यास धोनीचा चौथ्या जागेवर विचार करुन पंतला मधल्या फळीत संधी देता येऊ शकते. याचसोबत अजिंक्य रहाणेनेही वन-डे सामन्यात भारतासाठी सलामीला फलंदाजी केली आहे. यामुळे शिखर धवनच्या जागी रहाणेच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. 16 फेब्रुवारी 2018 नंतर अजिंक्य रहाणे एकही वन-डे सामना खेळला नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 193 धावा करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसह, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांनीही मधल्या फळीत चोख कामगिरी बजावली आहे. त्यामुळे, विश्वचषकासाठी निवड समिती आता पर्यायांचा विचार करत असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

Story img Loader