आता रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार असेल. बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले आहे. याआधी कोहलीने टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने कोहलीला स्वेच्छेने कर्णधारपद सोडण्यास सांगितले होते. मात्र कोहलीने ही गोष्ट ऐकली नाही, तेव्हा बोर्डाने संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली.
बीसीसीआयने विराट कोहलीला स्वेच्छेने कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला होता. यानंतर निवड समितीने बुधवारी विराटच्या जागी रोहितला भारताचा वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. बीसीसीआयच्या विधानात विराट कोहलीच्या हकालपट्टीची चर्चा देखील समाविष्ट करण्यात आली नव्हती, ज्यामध्ये फक्त असे म्हटले होते, की निवड समितीने रोहितला एकदिवसीय आणि टी-२० संघांचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय निवड समिती आणि बीसीसीआयने विराटला कर्णधारपदावरून काढून टाकले, ज्याची महत्त्वाकांक्षा बहुधा २०२३च्या मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची असेल. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यातून भारत बाहेर पडला त्या क्षणी, विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली होती.
हेही वाचा – कुंग फू पंड्याची लवकरच निवृत्ती..! हार्दिक सोडणार क्रिकेटचा ‘हा’ फॉरमॅट; देणार ४४० व्होल्टचा धक्का?
सरतेशेवटी बीसीसीआयकडे विराटची हकालपट्टी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे दिसते. यानंतर बीसीसीआयने पुढे जाऊन तेच केले. धोनीनंतर विराट कोहली संघाचा कर्णधार झाला. आता कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असेल आणि मर्यादित षटकांचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून होईल. या दौऱ्यात भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.
एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून रोहितच्या नियुक्तीचे अनेक माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी स्वागत केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला, हा अगदी योग्य निर्णय आहे. त्याचबरोबर आयसीसीनेही रोहितचे अभिनंदन केले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी नव्या युगाची सुरुवात असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.