आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीत लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची नव्याने नियुक्ती झाली. मात्र या नियुक्तीच्या पद्धतीवरून वादंग निर्माण झाला. मात्र बीसीसीआयला आशियाई देशांतर्फे पाठिंबा मिळाला आहे. शिवरामकृष्णन यांच्या नियुक्तीवरून आंतरराष्ट्रीय वर्तुळात दोन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवरामकृष्णन यांची नियुक्ती गैरपद्धतीने झाल्याचा आरोप गैरआशियाई देशांनी केला होता. मात्र आता आशियाई देशांनी बीसीसीआयला समर्थन दिल्याने गैरआशियाई देशांचा विरोध मावळण्याची शक्यता आहे.
शिवरामकृष्णन यांच्या नियुक्तीवरून उठलेल्या वादंगामुळे भारताने जून महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पसरले होते. मात्र यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी क्रिकेटला दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. कोणत्याही आशियाई खेळाडूंच्या नियुक्तीवरून वाद निर्माण केला जातो. हे सर्वस्वी चुकीचे आहे. शिवरामकृष्णन यांच्या नियुक्तीसंदर्भात पाकिस्तान तसेच श्रीलंका बोर्डाने आम्हाला पाठिंबा दिल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीत टीम मे यांच्या जागी शिवरामकृष्णन यांची निवड झाली होती. या पदासाठीच्या निवडणुकीत मे यांनी बाजी मारली होती. मात्र बीसीसीआयच्या दबावामुळे पुनर्निवडणुका झाल्या आणि शिवरामकृष्णन यांना संधी मिळाली, असा आरोप बीसीसीआयवर झाला होता. याप्रकरणी खेळाडूंच्या संघटनेने या नियुक्तीविरोधात आयसीसीच्या शिस्तपालन समितीद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा