३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेला मुकणार आहे. सरावादरम्यान पाठीला झालेल्या दुखापतीमुळे बुमराहने आपलं संघातलं स्थान गमावलं. त्याच्या जागेवर उमेश यादवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. बुमराहच्या पाठीला झालेली दुखापत पाहता तो यंदाचं उरलेलं वर्ष खेळू शकणार नसल्याचं कळतंय. त्याच्या याच दुखापतीबद्दल BCCI ने महत्वाची बातमी दिली आहे.

IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, बुमराहला सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. बांगलादेशच्या आगामी भारत दौऱ्याआधी बुमराह दुखापतीमधून सावरतो का याकडे बीसीसीआयचे अधिकारी लक्ष देणार आहेत. “ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बुमराह आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत इंग्लंडला रवाना होतोय. तिकडे त्याच्यावर उपचार होतील, याआधी २-३ डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर उपचारांबद्दल निर्णय घेतला जाईल.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने माहिती दिली.

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत बुमराहने आश्वासक गोलंदाजी केली होती. मात्र आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता बुमराहची दुखापत भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी आहे.

Story img Loader