Pakistan vs New Zealand practice match behind closed doors: भारतात होणार्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या मुख्य स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सराव सामना खेळवला जाणार आहे. मात्र, हैदराबादमध्ये होणारा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना बंद दाराआड खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ घातला. त्याचबरोबर अनेक क्रिकेट समीक्षकांनीही बोर्डाच्या या निर्णयामागील कारण जाणून न घेता या प्रकरणावर भाष्य केले.
बीसीसीआयने असे करण्यामागचे कारण काय?
भारतीय क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सराव सामना बंद दाराआड खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शुक्रवारी होणार आहे. हा सामना तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
का बंद दाराआड खेळला जाणार सामना?
अलीकडेच, पाकिस्तानमध्ये होणार्या आशिया चषकापूर्वी, दोन्ही देशांमधील राजकीय तणाव पाहता भारतीय मंडळाने तेथे आपले खेळाडू पाठविण्यास नकार दिला होता. त्यानंतर आशिया कप पाकिस्तान आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाने श्रीलंकेत फायनलसह सर्व सामने खेळले होते. मात्र, भारतात पाकिस्तानी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अशी कोणतीही अडचण नाही. पण तरीही पाकिस्तान संघाचा सामना बंद स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. वास्तविक, यामागचे कारण म्हणजे भारतात ऑक्टोबर महिन्यात होणारे सण आहेत.
हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: ॲलेक्स कॅरीचा झेल घेतल्यानंतर विराट कोहलीने केले मजेशीर सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल
सोमवारी एका निवेदनात, बीसीसीआयने सांगितले की, “स्थानिक सुरक्षा एजन्सीच्या सल्ल्यानुसार हा सामना आता बंद दाराच्या मागे होईल. (हा सामना) हैदराबादमधील सामना २९ सप्टेंबर रोजी होणार्या उत्सवांशी भिडत आहे आणि संपूर्ण शहरात (त्या दिवशी) मोठ्या मेळाव्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी या सामन्यांची तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना पूर्ण परतावा मिळेल.”
हेही वाचा – VIDEO: उष्णतेमुळे दमलेल्या स्टीव्ह स्मिथने बसण्यासाठी मैदानातच मागवली खुर्ची, विराट कोहलीने घेतली मजा
नऊ सराव सामन्यांसह विश्वचषक २०२३ च्या सामन्यांची तिकिटे गेल्या महिन्यात ऑनलाइन विक्रीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. पाकिस्तान-न्यूझीलंड सराव सामन्याचे पूर्ण पैसे त्यांना परत मिळतील, असे आश्वासन बोर्डाने चाहत्यांना दिले आहे. यापूर्वी, हैदराबाद पोलिसांनी आयोजकांना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द करण्याचे आवाहन केले होते. कारण ते २ सप्टेंबर रोजी संपणाऱ्या गणेश विसर्जन आणि मिलन-उन-नबी या सणांमुळे सामन्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्थापित करण्यास शक्य होणार नाही.मात्र, बीसीसीआयने हा सामना रद्द करण्याऐवजी बंद स्टेडियममध्ये चाहत्यांशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून खेळाडूंना पूर्णपणे सुरक्षित ठेवता येईल.