BCCI funds 50 crores to all state associations: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचे आयोजनात कोणतीही कसर न सोडण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली. विश्वचषक २०२३ च्या तयारीसाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेदरम्यान पावसाशी संबंधित व्यत्यय कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात काही विश्वचषक सामन्यांच्या स्थळांवर पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बीसीसीआयकडून, सर्व राज्य संघटनांना पावसाच्या कव्हरसह संपूर्ण ग्राउंड कव्हरेज सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण ग्राउंड रेन कव्हर स्थापित करण्याचा निर्णय हा स्पर्धा हवामान-प्रेरित व्यत्ययांपासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आहे. चाहत्यांना आणि खेळाडूंसाठी अखंड गेमप्ले आणि एक अविस्मरणीय क्रिकेट अनुभव देण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करताना दिसत आहे.
बीसीसीआयने त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक एकदिवसीय विश्वचषक सामन्याच्या स्टेडियमला ५० कोटी रुपयांचे वाटप करण्याचे पाऊल उचलले आहे. या निधीचा वापर सुविधा अपग्रेड करण्यासाठी आणि एकूण चाहत्यांच्या अनुभवांमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जाईल. ग्राउंडला रेन कव्हर बसवण्याव्यतिरिक्त, आसनव्यवस्था, विश्रामगृहाची सुविधा आणि सुरक्षा उपायांमध्ये वाढ करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना जागतिक दर्जाचा अनुभव मिळणे हे निधी वाटपाचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा – MLC 2023: एमआय न्यूयॉर्क जिंकताच किरॉन पोलार्डने उडवली खिल्ली, ड्वेन ब्राव्हो झाला नतमस्तक, पाहा VIDEO
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, धर्मशाळा, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, लखनऊ आणि कोलकाता यासह भारतातील दहा अधिकृत ठिकाणी होणार आहे. स्पर्धेपूर्वी तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी या शहरांमध्ये सराव सामने खेळले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या फायनल सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे बीसीसीआयने ही गोष्ट लक्षात घेऊन आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.