Rinku Singh Selection In India A Team : मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा फिनिशर म्हणून उदयास आलेल्या रिंकू सिंगला त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. रिंकू सिंगला २४ जानेवारीपासून इंग्लंड लायन्सविरुद्ध सुरू होणाऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघात स्थान देण्यात आले आहे. याचा अर्थ रिंकू सिंग आता कसोटी क्रिकेटध्येही भारतासाठी कामगिरी करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर रिंकू सिंग भविष्यात टीम इंडियाच्या टेस्ट प्लॅनचा महत्त्वाचा भाग बनू शकतो, हेही स्पष्ट झाले आहे.
बीसीसीआयने आज एक निवेदन जारी करून रिंकू सिंगच्या भारत अ संघात सामील झाल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “इंग्लंड लायन्सविरुद्ध २४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी रिंकू सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे.” अशा परिस्थितीत रिंकूला कसोटी खेळताना पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. आता रिंकू आपल्या स्टाईलमध्ये काही बदल करतो की फक्त टी-२० स्टाईलमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे हे पाहायचे आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२०९ मालिकेत रिंकू सिंगने चमकदार कामगिरी केली होती. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने अवघ्या २२ धावांत ४ विकेट्स गमावल्या. यानंतर रिंकू सिंगने रोहित शर्मासह ६९ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली. रिंकू सिंगच्या खेळीची सर्वात खास गोष्ट म्हणजे शेवटच्या षटकात मारलेली षटकारांची हॅट्ट्रिक. यानंतर हे स्पष्ट झाले की रिंकू सिंग आता मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतासाठी एक विश्वासार्ह फिनिशर बनला आहे.
हेही वाचा – Virat Kohli : अयोध्येत दिसला किंग कोहलीचा डुप्लिकेट, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड; पाहा VIDEO
पुढचा सामना कधी होणार –
भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात तीन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. आता मालिकेतील दुसरा सामना २४ जानेवारीपासून अहमदाबादमध्ये होणार आहे. हा सामना फक्त ४ दिवसांचा आहे, ज्यामध्ये भारताचा अ संघ इंग्लंड लायन्ससोबत खेळत आहे. भारत मालिकेतील पहिला सामना सहज गमावू शकला असता, परंतु स्टार फलंदाज केएस भरत आणि साई सुदर्शन यांनी भारतीय अ संघासाठी शानदार खेळी खेळली आणि पराभूत होणारा सामना अनिर्णित राखला.
दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, सौवर कुमार, अर्शदीप कुमार, तुषार देशपांडे, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल, रिंकू सिंग.