दिलीप वेंगसरकरला बीसीसीआयने सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवले. खूप समाधान वाटले. काही व्यक्ती कर्तृत्वाने इतक्या निर्विवाद श्रेष्ठ असतात, की त्या पुरस्काराकरिता त्यांच्या योग्यतेविषयी थोडीशीही शंका नसते. उलट चेहऱ्यावर उत्स्फूर्तपणे प्रसन्नता अवतरते.
दिलीप वेंगसरकरबद्दल बोलायचे तर क्रिकेटच्या त्या सुवर्णकाळात रमायचे ज्या वेळेस रेडिओ समालोचनाचा रोमँटिक काळ होता. जसदेवसिंग, डिकी रत्नागर, अनंत सेटलवाड, रवि चतुर्वेदी, सुशील दोशी यांनी त्यांच्या चक्षूंनी आपल्याला जगभराची क्रिकेट सफर घडवली. त्यांना कधीकधी वाटते की जे आपण आज टीव्हीवर प्रत्यक्ष बघतो त्यापेक्षाही रेडिओ समालोचकांनी केलेले वर्णन आणि आपण कल्पनेने अनुभवलेला तो धावता प्रवास जास्त रोमहर्षक होता. गावसकर, वेंगसरकर, विश्वनाथ, मोहिंदर हे त्या वेळचे अनेकांचे भारतीय सैन्यामधल्या सैनिकांसारखे हीरो होते. प्रत्यक्ष मैदानात प्रचंड वेगात येणाऱ्या तोफगोळय़ासारख्या बॉलचा सामना करायचा, कधी बॉल छातीवर घ्यायचा, कधी डोक्यावर घ्यायचा आणि थोडीशीदेखील चलबिचल न दाखवता पुन्हा उभे राहायचे. हेतू कोणता, पैसा, श्रीमंती, गाडय़ा, बंगले? छे! बिलकुल नाही. क्रिकेटरचं प्रेम, त्या खेळात स्वत:ला सिद्ध करण्याची महत्त्वाकांक्षा आणि क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांची कौतुकाची थाप मिळवणे या शुद्ध हेतूने लढणारे हे लढवय्ये.
वेंगसरकरने १९७५ साली इराणी ट्रॉफीमध्ये प्रसन्ना, बेदीला सिक्सरवर सिक्सर मारून धडाक्यात आगमन केले. सी. के. नायडूनंतर लांब लांब षटकार मारणारा हाच म्हणून त्याची ‘कर्नल’ अशी ओळख झाली. वेस्ट इंडिजच्या त्याच्या पहिल्या दौऱ्यात कर्दनकाळ पिचेससमोर त्याला त्रास झाला. पण पुढील काळात त्याने आपली वन डाऊन पोझिशन बनवली. गावसकर, वेंगसरकर, विश्वनाथ, मोहिंदर यांची बॅटिंग ऐकायची आहे हा आयुष्याचा आधार होता. इंग्लंड, वेस्ट इंडिजच्या मॅचेसची कॉमेन्ट्री संध्याकाळी सुरू व्हायची. अंधाऱ्या खोल्या, मारकुटे मास्तर, पाठांतराला अभ्यास म्हणणारी शिक्षणपद्धती असल्या खत्रूड शालेय वातावरणाला सकाळपासून आम्ही सहन करायचो ते हय़ा एकाच मानसिक बळावर. घरी जाऊन कॉमेन्ट्री ऐकायची आहे. वेंगसरकर, विश्वनाथची लॉर्ड्सवरची भागीदारी, गावसकर, वेंगसरकरची ओव्हलवरची भागीदारीतला आज बॉल आणि बॉल आठवतोय. लॉर्ड्सला वेंगसरकर, विश्वनाथने सेंच्युरी मारून मॅच ड्रॉ केली. १९७९च्या इंग्लंड दौऱ्यात गावसकर आणि वेंगसरकरने ४३७ धावांचा पाठलाग सत्यात उतरवून दाखवला. गावसकरने २२१ करताना दुसऱ्या बाजूने चौहान आणि वेंगसरकरने खंबीर साथ दिली. खालच्या फळीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने आठ रन्स कमी पडल्या आणि मॅच ड्रॉ झाली. वेंगसरकरच्या लॉर्ड्सच्या तिन्ही सेंच्युरीज कमाल होत्या.
मला त्याची अजून एक खेळी खूप आवडते, म्हणजे त्याने १९८५च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेटमध्ये सेमी फायनलला न्यूझीलंडविरुद्ध केलेले अर्धशतक. धावा करणे अवघड असतानासुद्धा त्याने डोळय़ांचे पारणे फिटणारे कव्हर ड्राइव्हज् मारले आणि कपिलच्या साथीत मॅच जिंकून दिली.
सहा फूट उंचीचा वेंगसरकर एकाग्रतेने स्टान्स घेऊन उभा राहिला की हिमालयातल्या शिळेवर डोळे मिटून तपश्चर्येला बसलेल्या ऋषीसारखाच वाटे. फलंदाजीला तपश्चर्या मानणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या पाठशाळेत तयार झालेला होता तो. विकेट बहाल करायची म्हणजे आयुष्याची कमाई बहाल करण्यासारखे पाप मानले जायचे मुंबई क्रिकेटमध्ये. डिफेन्स करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. डिफेन्स करताना तो फार वाकत नसे. बॉलला बॅटवर लेट येऊ देऊन उभ्या उभ्या संरक्षण करण्याचे त्याचे तंत्र होते. काही वेळेस उभ्या उभ्या खेळण्याने त्याचा घात व्हायचा. पण फलंदाजीच्या बायबलमधले सगळे फटके तो बाळगून होता. मिडअॉन आणि मिडविकेटमधून मारलेला रायफल शॉट त्याचा ट्रेडमार्क होता. त्या दर्जाचा शॉट नंतर द्रविडकडे पाहायला मिळाला. कव्हर्समधून ड्राइव्ह मारताना गौतम राजाध्यक्षांना घायाळ करेल असा त्याचा फॉलो थ्रू होता. भारतीय फलंदाजांना सहसा वश न होणारे हूक आणि पूल त्याच्या भात्यात होते.
तो एक सेफ क्षेत्ररक्षक होता. फॉरवर्ड शॉर्टलेगला त्याने काही उत्तम झेल घेतले. ऑस्ट्रेलियात लेन पॅस्कॉला केलेला रिफ्लेक्स वन आऊट कायम आठवतो.
शांतपणे त्याने आपले कर्तव्य पार पाडले. गाजावाजा नाही, पत्रकारांत फार मैत्री नाही. मुलाखती नाही. तो बोलला त्याच्या गन अँड मूरच्या बॅटने. निवृत्तीनंतरसुद्धा असाच प्रकाशझोतापासून बाजूला राहून क्रिकेटची सेवा केली क्रिकेटच्या निखळ प्रेमापोटी. अॅकॅडमी चालवल्या. गावोगावी जाऊन होतकरू खेळाडू हेरले. निवड समिती अध्यक्ष असतानासुद्धा सचोटीने काम केले.
त्याच्या कर्तृत्वाच्या उत्तुंगतेने तो कर्नलचा जनरल कधीच झाला आहे. सॅल्यूट टू यू दिलीप!
BLOG: वेंगसरकर- कर्नल टू जनरल
दिलीप वेंगसरकरला बीसीसीआयने सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवले. खूप समाधान वाटले. काही व्यक्ती कर्तृत्वाने इतक्या निर्विवाद श्रेष्ठ असतात, की त्या पुरस्काराकरिता त्यांच्या योग्यतेविषयी थोडीशीही शंका नसते. उलट चेहऱ्यावर उत्स्फूर्तपणे प्रसन्नता अवतरते.
First published on: 26-11-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci honour dilip vengsarkar with lifetime achievement award