भारतीय क्रिकेट पुरूष संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. आगामी टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. बीसीसीआयने अर्ज करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्याचबरोबर राहुल द्रविडही पुन्हा अर्ज करू शकतात. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा ३ वर्षांचा असेल.
२७ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असेल. नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ १ जुलै २०१४ ते ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत असेल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. तसेच, नवीन प्रशिक्षक कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमधील भारतीय संघाच्या एकूण कामगिरीसाठी जबाबदार असेल.
बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी घातल्या कठोर अटी
किमान ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामन्यांचा अनुभव.
किंवा किमान दोन वर्षे पूर्ण वेळ कसोटी खेळणाऱ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
किंवा कोणत्याही असोसिएट सदस्य संघाचा/कोणत्याही आयपीएल संघाचा किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचा किंवा कोणत्याही देशाच्या अ संघाचा तीन वर्षे प्रशिक्षक असण्यचा अनुभव.
किंवा बीसीसीआयचे लेव्हल-3 कोचिंग प्रमाणपत्र धारक असले पाहिजे.
आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.
हेही वाचा- IPL 2024: GT vs KKR सामना रद्द झाल्याने कुणाचं प्लेऑफचं स्वप्न पाण्यात? कुणाला झाला फायदा?
गेल्या आठवड्यात, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले होते की भारतीय क्रिकेट बोर्ड लवकरच मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी अर्ज मागवणार आहे, तसेच सध्याचे पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड – ज्यांचा राष्ट्रीय संघासोबतचा त्यांचा करार जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. ते या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतील.
“राहुल द्रविड यांचा कार्यकाळ विश्वचषकापर्यंत आहे, आम्ही मुख्य प्रशिक्षकपदासाठी लवकरच अर्ज मागवू आणि द्रविड यांना पुन्हा अर्ज करायचा असेल तर ते करू शकतात. आम्ही निकष ठरवले आहेत. त्यानंतर आम्ही क्रिकेट सल्लागार समितीशी चर्चा करून सपोर्ट स्टाफसाठीही अर्ज मागवू. प्रशिक्षकाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल, असे शाह म्हणाले होते.